महिला जवानाने लगावली कंगनाच्या कानशिलात; म्हणाली, आईच्या अपमानाचा घेतला बदला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 06:41 AM2024-06-07T06:41:32+5:302024-06-07T07:06:00+5:30
कंगना रणौत चंडीगडहून दिल्लीला रवाना होत असताना ही घटना घडली.
चंडीगड : भाजपच्या नवनिर्वाचित खासदार व अभिनेत्री कंगना रणाैत यांना चंडीगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने गुरुवारी कानशिलात लगावली. २०२१ साली झालेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महिलांना १०० ते २०० रुपये मिळाले होते, असे विधान कंगना यांनी केले होते. त्यावर संतप्त झालेल्या महिला जवानाने आंदोलनात माझी आईदेखील सहभागी झाली
होती, असे म्हणत कंगनाच्या कानशिलात लगावली.
दरम्यान, या प्रकरणी महिला जवानाला निलंबित करण्यात आले. कंगना रणौत चंडीगडहून दिल्लीला रवाना होत असताना ही घटना घडली. यासंदर्भात एका व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले की, पंजाबमध्ये दहशतवाद व हिंसाचारात वाढ होत असून ही चिंता वाटण्याजोगी स्थिती आहे. सीआयएसएफच्या महिला जवानाने मला कानाखाली मारली व शिवीगाळही केली असेही त्यांनी सांगितले.
सदर महिलेने हे कृत्य का केले, अशी कंगना यांनी तिच्याकडे विचारणा केली. त्यावर ती महिला सैनिक म्हणाली, मी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची समर्थक आहे. दरम्यान सीआयएसएफच्या महिला सैनिकावर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी गुरुवारी केली आहे.