'मुंबईतल्या एका नटीस Y प्लस सुरक्षा, पण हाथरसचे पीडित कुटुंब भगवान भरोसे'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 10:02 AM2020-10-06T10:02:05+5:302020-10-06T10:03:12+5:30

हाथरस घटनेवरुन सोशल मीडियात आरोपींविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांपासून ते बड्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या घटनेवरुन शोक आणि संताप व्यक्त केला आहे.

'A kangna get Y Plus security in Mumbai, but the victim's family in Hathras didnt get today, shivsena sanjay raut' | 'मुंबईतल्या एका नटीस Y प्लस सुरक्षा, पण हाथरसचे पीडित कुटुंब भगवान भरोसे'

'मुंबईतल्या एका नटीस Y प्लस सुरक्षा, पण हाथरसचे पीडित कुटुंब भगवान भरोसे'

Next
ठळक मुद्देहाथरस घटनेवरुन सोशल मीडियात आरोपींविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांपासून ते बड्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या घटनेवरुन शोक आणि संताप व्यक्त केला आहे.

मुंबई - उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेवरुन देशात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र आता या घटनेवरुन राजकीय वातावरणही पेटू लागलं आहे. हाथरसमध्ये एका मागासवर्गीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणात ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या घटनेची चौकशी करण्यासाठी योगी सरकारने एसआयटी नेमली होती, तसेच हा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. मात्र, सीबीआयकडे हा तपास घाईघाईने देण्यात आल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. तसेच, पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेसंदर्भातही सामनातून टीका करण्यात आली आहे. 

हाथरस घटनेवरुन सोशल मीडियात आरोपींविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांपासून ते बड्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या घटनेवरुन शोक आणि संताप व्यक्त केला आहे. मात्र, शिवसेना-कंगना वादानंतर प्रत्येक गोष्टीवर आपलं मत मांडणारी कंगना याप्रकरणावर गप्प का? असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आला होता. त्यानंतर, आता पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेवरुनही शिवसेनंन प्रश्न उपस्थित केला आहे.  

''मुंबईतल्या एका नटीस केंद्र सरकार वाय प्लस सुरक्षा देते, पण हाथरसच्या पीडित मुलीच्या कुटुंबास 'भगवान भरोसे' सोडले जाते हे काही समान न्यायाचे तत्त्व नाही. डॉ. आंबेडकरांच्या घटनेला साजेसा हा न्याय नाही. याप्रकरणी अन्यायाचा स्फोट झाला तर दलित समाज संतापून रस्त्यावर उतरेल याचे भान ठेवले पाहिजे. स्वसंरक्षणार्थ दलितांना शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळावाच, पण शस्त्रखरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान मिळावे अशी मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी आता केली. ही पहिली ठिणगी आहे. त्या ठिणगीत तेल ओतण्याचे काम तरी सरकारने करू नये. सरकारने पहिल्या दिवसापासून लपवाछपवी केली नसती तर वातावरण इतके चिघळले नसते, असे शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारला प्रश्न विचारण्यात आला आहे.  

कंगनावर निशाणा

सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत? हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का? ज्या पोलिसांनी त्या मुलीस जाळले ते पोलीस त्या नटीबाईचे घरगडी आहेत काय? , असा सवाल शिवसेनेच्या अग्रलेखातून विचारण्यात आलाय. 

सीबीआयकडे तपास कशामुळे दिला ?

हाथरस बलात्कारप्रकरणी योगी सरकारचे पाय रोज खोलातच जात आहेत. बलात्कारपीडित मुलीचे हत्या प्रकरण पेटते आहे असे दिसताच योगी सरकारने या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देत असल्याची घोषणा केली. मुळात हा तपास सीबीआयकडे सोपवा अशी मागणी कोणी केली? हाथरसच्या पीडित मुलीच्या नातेवाईकांनी स्पष्ट सांगितले, सीबीआयचा तपास आणि नार्को टेस्ट वगैरेची मागणी आम्ही केलेली नाही. आम्हाला या सर्व प्रकाराची न्यायालयीन चौकशी हवी आहे. गुन्हेगारांना फाशीवर लटकवावे हेच आमचे मागणे आहे, पण योगी सरकारने काय करावे? पोलिसी बळाचा वापर करून पीडित मुलीच्या कुटुंबाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. त्या मुलीचा मृतदेह रात्रीच पोलिसांच्या मदतीने जाळून टाकला. त्या मुलीच्या घरी कुटुंबास भेटण्यासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांवर लाठय़ा चालवल्या, पण जनमताचा रेटा पुढेच सरकू लागला तेव्हा योगी सरकारने या सर्व प्रकरणी हाथरस पोलिसांचा बळी देऊन काखा वर केल्या व आता हाथरसचा तपास सीबीआयकडे सोपवून मोकळे झाले.

Read in English

Web Title: 'A kangna get Y Plus security in Mumbai, but the victim's family in Hathras didnt get today, shivsena sanjay raut'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.