कन्हैयाच्या जामिनावरील सुनावणी खोळंबली

By Admin | Published: February 20, 2016 02:57 AM2016-02-20T02:57:19+5:302016-02-20T02:57:19+5:30

जेएनयू विद्यार्थी संघाचा नेता कन्हैयाकुमारच्या जामिन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी न झाल्याने ती आता सोमवारी अथवा मंगळवारी होईल

Kanhaiya bail bail hearing | कन्हैयाच्या जामिनावरील सुनावणी खोळंबली

कन्हैयाच्या जामिनावरील सुनावणी खोळंबली

googlenewsNext

सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली
जेएनयू विद्यार्थी संघाचा नेता कन्हैयाकुमारच्या जामिन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी न झाल्याने ती आता सोमवारी अथवा मंगळवारी होईल. सर्वोच्च न्यायालयाने जामिनाचा अर्ज उच्च न्यायालयात करण्याच्या सूचना कन्हय्याच्या वकिलांना सकाळी दिल्यानंतर उच्च न्यायालयात दुपारी अर्ज दाखल झाला. कोर्टाच्या रजिस्ट्रारनी त्यात अर्जात काही दुरुस्त्या करून मागितल्याने वकिलांनी अतिरिक्त दस्तऐवज दाखल करण्यासाठी वेळ मागून घेतल्याचा हा परिणाम आहे.
जामीन अर्जाच्या सुनावणीस नकार देतांना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की सुरक्षेच्या कारणास्तव असे अर्ज आमच्याकडे येऊ लागल्यास आमच्याकडे अल्पावधीतच अर्जांचा ढिग गोळा होईल.
तांत्रिकदृष्ट्या कनिष्ठ न्यायालयांनी जामीन नाकारला, तरच येथे अर्ज दाखल करणे उचित ठरते, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टात जाण्याचा पर्याय कन्हैयाच्या वकिलांना सुचवला.
> ‘अपयश लपविण्यासाठी भावनात्मक वाद’
४मोदी सरकारने आर्थिक आघाडीवरील अपयश लपविण्यासाठी भावनात्मक वाद निर्माण केला असल्याचा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत टोलेजंग आश्वासने दिल्यानंतर मोदी सरकारला आर्थिक आघाडीवर आलेले मोठे अपयश दडविण्याचा हा प्रयत्न आहे, असे नितीशकुमार यांनी पाटण्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर म्हटले.
कोणतेही पुरावे नसताना जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार याच्यावर देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले आहेत.
> बहीण फतिमा म्हणते, उमर हा भारताचा खरा पुत्र...
जेएनयूमधील पीएचडीचा विद्यार्थी उमर खालिद हा भारताचा खरा पुत्र आहे, असे त्याची बहीण फतिमा हिने म्हटले. उमरवरील आरोप खोटे आणि बनावट आहेत. त्याच्या या प्रकरणामुळे आमच्या कुटुंबाचे मनस्वास्थ्य हरपले आहे, असे तिने अमेरिकेहून पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले. ती अमेरिकेत पीएचडी करीत आहे.
वृत्तवाहिन्यांनी खोट्या माहितीच्या आधारावर त्याला दोषी ठरविले आहे. सर्वप्रथम त्याचा जैश-ए- मोहम्मदशी संबंध असल्याच्या गुप्तचर अहवालाचा दाखला देण्यात आला होता. आता ही कथा अनेक वळणे घेऊ लागली आहे, असेही ती म्हणाली. उमर हा डाव्या दहशतवादी संघटनेशी संबंधित डेमॉक्रॅटिक स्टुडंट युनियनचा माजी सदस्य असून तो जेएनयूमधील प्रकरणानंतर बेपत्ता आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
> संघाने आम्हाला शिकवू नये -राहुल गांधी
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रायबरेलीत बोलताना भाजप, रा.स्व.संघाने आम्हाला देशप्रेमाचा धडा शिकविण्याची गरज नाही, या शब्दांत सुनावले.
त्यांनी शुक्रवारी अमेठी मतदारसंघातील सलोन येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रथमच डाळींचे भाव आकाशाला भिडले असून भाजप सरकारला आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक शेतकऱ्याला १५ लाख रुपये द्यावे अथवा पद सोडावे. मी संसदेतही शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करणार आहे, असे ते म्हणाले.
> विरोधक असणे हा गुन्हा
नवी दिल्ली : जेएनयु प्रकरण पेटल्यानंतर दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून त्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे केला आहे. ते म्हणतात, तुम्ही भाजपचे सदस्य अथवा समर्थक असाल तर तुमच्यासाठी बलात्कार, खून अथवा मारहाण हा गुन्हा नाही. भाजप अथवा रा.स्व.संघाचा विरोधक असणे हाच सर्वात मोठा गुन्हा आहे.’ कन्हैयाच्या अटकेला केजरीवालांनी विरोध नोंदवला आहे. कोर्टाबाहेर भाजपचे आमदार ओ.पी.शर्मा आणि काही वकील मारहाण करीत असताना कॅमेऱ्यात दिसत असल्याचा संदर्भ देताना केजरीवाल यांनी कुणाचाही नामोल्लेख करण्याचे टाळले.
> वकिलांचा मोर्चा : पतियाळा हाऊस कोर्टाजवळ तणावपतियाळा हाउस कोर्टात शुक्रवारी प्रा. एस.आर.गिलानींच्या जामीन अर्जाची सुनावणी सुरू असताना न्यायालयाच्या बाहेर वकिलांनी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला. सोमवारी आणि बुधवारी न्यायालयाच्या आवारात पत्रकार, प्राध्यापक व कन्हय्याला मारहाण करणाऱ्या वकिलांच्या जमावाने हातात तिरंगी झेंडे घेत, वंदे मातरमच्या घोषणा देत इंडिया गेटपर्यंत मोर्चा काढला. मारहाण प्रकरणातील आरोपी असलेल्या आणि पोलिसांचे समन्स धुडकावून लावलेल्या अ‍ॅड. विक्रमसिंग चौहान व अन्य आरोपी वकिलांचे या मोर्चात उघडपणे समर्थन केले गेले. वकिलांचा हा व्यवहार पाहून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ केटीएस तुलसी म्हणाले, न्यायव्यवस्थेवर या वकिलांचा विश्वास उरलेला दिसत नाही. हे चित्र पहातांना असे वाटते की पोलीस आणि मोर्चा काढणाऱ्या वकिलांमधे संगनमत असावे. पतियाळा हाउस कोर्टातील एकाही वकिलाला अटक आम्ही खपवून घेणार नाही, दिल्लीतील तमाम न्यायालये बेमुदत बंद केली जातील, अशी आक्रमक भाषाही काही वकिलांनी केली.
प्रा गिलानी यांचा जामीन अर्ज मात्र कोर्टाने फेटाळला. त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Kanhaiya bail bail hearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.