कन्हैयाची पुन्हा तिहारमध्ये रवानगी
By Admin | Published: February 27, 2016 04:16 AM2016-02-27T04:16:56+5:302016-02-27T04:16:56+5:30
जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमारला पोलिसांनी तिहार तुरुंगातून गुरुवारी रात्री अज्ञातस्थळी हलविल्यानंतर शुक्रवारी पुन्हा त्याची तिहार कारागृहात रवानगी
नवी दिल्ली : जेएनयू विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैया कुमारला पोलिसांनी तिहार तुरुंगातून गुरुवारी रात्री अज्ञातस्थळी हलविल्यानंतर शुक्रवारी पुन्हा त्याची तिहार कारागृहात रवानगी केली. तो १२ फेब्रुवारीपासून देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असून, सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
एक दिवसासाठी त्याची कोठडी मागताना दिल्ली पोलिसांनी कोर्टात सांगितले की जेएनयूतील वादग्रस्त कार्यक्रमासंदर्भात अटक झालेले उमर खालिद व अनिर्बन भट्टाचार्य या दोघांच्या व कन्हैयाच्या विधानात विसंगती आहे. त्याचा खुलासा करण्यासाठी कन्हैया व त्या दोघांना समोरासमोर बसवून पुढील तपास आवश्यक आहे.
पोलिसांच्या या याचिकेला विरोध करताना कन्हैयाचे वकील म्हणाले की, अटक झालेले दोघे दुसऱ्याच संघटनेशी संबंधित असून, त्यांचा व कन्हैयाचा काही संबंध नाही. शिवाय सुरुवातीचे पाच दिवस कन्हैया पोलीस कोठडीत असताना त्याची चौकशी करण्यास पोलीसांना पुरेसा वेळ मिळाला होता.
कन्हैयाचा भाऊ मणिकांतने त्याची गुरुवारी तिहार तुरुंगात भेट घेतली. या भेटीनंतर अतिशय भावनिक होउन तो म्हणाला की, कन्हैया निर्दोष असूनही हायकोर्टात त्याच्या जामीन अर्जाची सुनावणी वारंवार पुढे ढकलली जात आहे. कोर्टात विविध कारणे सांगून पोलीस त्याला बाहेर येण्यात अटकाव करीत आहेत. त्याला बाहेर येता न आल्यास तो तुरुंगातूनच पी.एच्डी. पूर्ण करेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जेएनयूच्या माजी प्राध्यापकाकडून पुरस्कार परत
जेएनयू प्रकरण हाताळण्यात सरकार आणि पोलिसांनी जे विचित्र प्रकार अवलंबले त्याने व्यथित झालेले जेएनयूचे माजी प्राध्यापक चमनलाल यांनी शुक्रवारी आपला असंतोष व्यक्त केला. विद्यापीठाकडून मिळालेला एक पुरस्कारही परत करीत असल्याची घोषणा त्यांनी केली.