कन्हय्याने घोषणा दिलीच नाही; ‘स्टिंग’मध्ये उलगडा
By admin | Published: February 27, 2016 04:46 AM2016-02-27T04:46:12+5:302016-02-27T04:46:12+5:30
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याने एकही घोषणा दिली नाही, अशी साक्ष विद्यापीठातील रक्षक आणि पोलिसाने
नवी दिल्ली : देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेला जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याने एकही घोषणा दिली नाही, अशी साक्ष विद्यापीठातील रक्षक आणि पोलिसाने दिली असून या दोघांची साक्ष नोंदली जात असतानाचा स्टिंग व्हिडीओ जारी झाला आहे.
जेएनयू कॅम्पसमध्ये ९ फेब्रुवारी रोजी कार्यक्रम पार पडला तेव्हा अमरजीत कुमार हा सुरक्षा रक्षक कन्हय्याबाबत साक्ष देताना एका टीव्ही वाहिनीने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसत आहे. विद्यार्थ्यांनी मार्च काढल्यानंतर कन्हय्याने भाषण दिले; मात्र त्याने एकही घोषणा दिली नव्हती. खालिद हा घोषणा देताना स्पष्ट दिसतो, असे पोलिसाने सांगितले. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी कन्हय्या कुमार, उमर खालिद आणि अनिर्बन भट्टाचार्य यांची एकत्रित जबानी घेतली. पहाटे पाच तास एकत्रितरीत्या प्रश्न विचारण्यात आल्यानंतर सकाळी १०.३० वाजता चौकशीला पुन्हा सुरुवात झाली. जेएनयूच्या अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली असतानाही या कार्यक्रमाला १० ते १५ जणांनी हजेरी लावली होती, असेही अमरजीतने म्हटले. मी साध्या वेशात हजर होतो, असे हेड कॉन्स्टेबल रामबीर यांनी म्हटल्याचे व्हिडीओत दिसते. अफझल गुरूच्या समर्थनार्थ गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठात कार्यक्रम आयोजित केला जातो, असे तो सांगतो.