कोलकातामधील रॅलीत कन्हैया कुमारवर शाईफेक, धक्काबुक्कीत तीन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 05:14 PM2017-08-23T17:14:47+5:302017-08-23T17:18:39+5:30
जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर कोलकातामधील रॅलीत शाई फेकण्यात आली आहे. यावेळी दोन संघटनेत झालेल्या धक्काबुक्कीत तीन जण जखमी झाले आहेत.
नवी दिल्ली, दि. 23 - जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारवर कोलकातामधील रॅलीत शाई फेकण्यात आली आहे. यावेळी दोन संघटनेत झालेल्या धक्काबुक्कीत तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दक्षिण कोलकातामधील जाधवपूर येथे अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली होती. यावेळी त्याच्यावर शाई फेकण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जाधवपूर येथील रॅलीमध्ये माकप आणि हिंदुत्ववादी समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली. या झटापटीत तीन जण जखमी झाले आहेत.
कन्हैय्या कुमार याच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीमध्ये हिंदुत्ववादी समर्थकांच्या गटाशी संबंधित काही लोकांनी कन्हैया कुमारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कन्हैयाने येथून निघून जावे, असा इशारा दिला. त्याला विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यात तीन जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
माकपचे वरिष्ठ नेते प्रबीर देव याविषयी म्हणाले की, कन्हैया कुमारच्या रॅलीदरम्यान अचानक काही लोकांनी घोषणाबाजी सुरू केली. कन्हैया कुमारने परत जावे, अशी जोरदार मागणी केली. त्यावेळी त्याच्या समर्थकांनी आमच्या समर्थकांना धक्काबुक्की केली. त्याला आमच्या समर्थकांनीही विरोध केला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले.
तरुणाने कन्हैया कुमारवर भिरकावली चप्पल -
2016 मध्ये हैदराबाद विश्वविद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान कन्हैय्या कुमारवर चप्पल भिरकावण्यात आली होती. कार्यक्रम सुरु असताना एका विद्यार्थ्यांना भारत माता की जय अशा घोषणा देत कन्हैय्या कुमारच्या दिशेने चप्प्ल फेकली. पोलिसांनी चप्पल फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं होतं. रोहीत वेमुला आत्महत्येप्रकरणी कन्हैय्याने विद्यार्थ्यांची भेट संवाद साधला. त्यावेळी बोलत असताना हा प्रकार घडला
‘कन्हैयाकुमार’सारख्या प्रवृत्तींना मिळावी ‘सजा-ए-मौत’ -
अखंड भारतासाठी जवान रात्रंदिवस सीमेवर लढत असतात. त्यांच्या वेदना कोणालाही जाणून घेता येणार नाहीत. सैनिकांबाबत आपण जास्त भावूक होत आहोत, अशी विधाने सर्रास केली जातात. सैनिक आणि देशाच्या सुरक्षेविरोधात बोलणारे अनेक कन्हैया कुमार आपल्यामध्येच आहेत. त्यांना ‘सजा-ए-मौत’च दिली पाहिजे, अशा परखड शब्दांमध्ये ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी निशाणा साधला.
बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे किशोरी आमोणकर व्यासपीठावर विक्रम गोखले यांना बलराज साहनी पुरस्कार, तर इंदुमती जोंधळे यांना कैफी आझमी पुरस्काराने गौरवण्यात आले.