कन्हैय्या कुमारच्या ताफ्यावर फेकले अंडे अन् विरोधात नारेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 03:34 PM2020-02-10T15:34:56+5:302020-02-10T15:37:46+5:30
सोमवारी सकाळी जमुई येथून निघाल्यानंतर महिसौरी बस स्थानकाजवळ
पटना - दिल्लीतील जेएनयु विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि कम्युनिष्ट पक्षाचे नेते कन्हैय्या कुमार यांच्या ताफ्यातील समर्थक आणि विरोधकांमध्ये वादावादी झाल्याची घटना घडली आहे. जमुई येथून नवादाला जात असताना त्यांच्या ताफ्यावर अंडे आणि मोबिल (कच्चे तेल) फेकण्यात आले. रविवारी जन गण मन यात्रेला कन्हैय्या यांनी संबोधित केले होते. त्यानंतर जमुई येथेच त्यांनी मुक्काम केल होता.
सोमवारी सकाळी जमुई येथून निघाल्यानंतर महिसौरी बस स्थानकाजवळ त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. यावेळी, लोकांनी कन्हैय्याच्या विरोधात घोषणाबाजी करत, त्यांच्या ताफ्यावर अंडे फेकले. सध्या, कन्हैय्या कुमार यांनी एनआरसी आणि सीएएला विरोध करत आपली जन गण यात्रा सुरू केली आहे. जवळपास 1 महिन्याचं वेळापत्रक असलेल्या या यात्रेदरम्यान, बिहारमधील सर्वच प्रमुख शहरांना कन्हैय्या भेट देणार आहेत. या दौऱ्यात साधारण 50 सभांचा आयोजनही करण्यात आलं आहे. 30 जानेवारी रोजी बेतिया येथून सुरू झालेली ही यात्रा 29 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. दरम्यान, यापूर्वी 7 फेब्रुवारी रोजी कटिहार येथे कन्हैय्या यांच्या रॅलीवर बुट फेकण्यात आले होते.