कन्हय्या देणार अटकेला आव्हान
By admin | Published: February 21, 2016 01:08 AM2016-02-21T01:08:22+5:302016-02-21T01:08:22+5:30
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वादात देशद्रोहाच्या आरोपाचा सामना करीत असलेला विद्यार्थी संघाचा नेता कन्हय्या कुमार दिल्ली पोलिसांसाठी मोठी अडचण निर्माण
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वादात देशद्रोहाच्या आरोपाचा सामना करीत असलेला विद्यार्थी संघाचा नेता कन्हय्या कुमार दिल्ली पोलिसांसाठी मोठी अडचण निर्माण करू शकतो. उच्च न्यायालयात सोमवारी जामिनासाठी याचिका दाखल करताना आपल्या अटकेलाही आव्हान देण्याचे कन्हय्याकुमार आणि त्याच्या वकिलांनी निश्चित केले आहे. जेएनयूमध्ये राष्ट्रविरोधी घोषणाबाजीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कन्हय्या कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती.
व्हिडिओ प्रयोगशाळेत...
जेएनयूमधील देशविरोधी घोषणाबाजीच्या ज्या व्हिडिओवरून वाद निर्माण झाला तो व्हिडिओ दिल्ली सरकारने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविला आहे. गेल्या ९ फेब्रुवारीला विद्यापीठ परिसरात झालेल्या या घोषणाबाजीची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश सरकारने यापूर्वीच दिले आहेत. या कथित व्हिडिओसोबत छेडछाड करण्यात आली आहे. मूळ चित्रणात त्याने देशविरोधी घोषणाबाजी केल्याचे दिसत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
पंतप्रधानांना आवाहन
जेएनयू वाद हाताळण्याच्या सरकारच्या पद्धतीला विरोध करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा राजीनामा देणारे विद्यार्थी नेते प्रदीप नरवाल यांनी पंतप्रधानांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सन्मान कायम राखण्याचे आवाहन केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘त्या’ तिघांविरुद्ध लुकआऊट नोटीस...
दिल्ली पोलिसांनी जेएनयूतील वादासंदर्भात तीन तरुणांविरुद्ध लुकआऊट नोटीस बजावली आहे. हे तीन संशयित तरुण देशाबाहेर पडू नये यासाठी पोलिसांनी फॉरेन रिजनल रजिस्ट्रेशन आॅफिसला या प्रकरणाची माहिती दिली असून विमानतळ अधिकाऱ्यांना सतर्क करण्याची सूचनाही दिली आहे. तीनही तरुण जेएनयूचे विद्यार्थी असल्याचे समजते.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेएनयूमधील घटनेचे हेच मुख्य सूत्रधार आहेत. विशेष म्हणजे ९ फेब्रुवारीपासून त्यांचे फोन बंद आहेत. तपासकर्त्यांनी यासंदर्भात घटनेचे साक्षीदार असलेल्या डझनावर विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविले आहेत.
१० जणांचा शोध...
दुसरीकडे विशेष शाखेलाही विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या शोधमोहिमेत समाविष्ट करण्यात आले आहे. पोलीस याप्रकरणी दहा लोकांचा शोध घेत आहेत.