कन्हैयाची जीभ कापा, गोळ्या घाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2016 04:01 AM2016-03-06T04:01:11+5:302016-03-06T04:01:11+5:30

देशद्रोहाचा आरोप असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याने जामिनावर तुरुंगाबाहेर येताच केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र

Kanhaiya's tongue cut, put pills! | कन्हैयाची जीभ कापा, गोळ्या घाला!

कन्हैयाची जीभ कापा, गोळ्या घाला!

Next

नवी दिल्ली/बदायूं : देशद्रोहाचा आरोप असलेला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमार याने जामिनावर तुरुंगाबाहेर येताच केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र सोडल्याने भाजपा नेते संतापले आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे उत्तर प्रदेशातील बदायंू जिल्हाध्यक्ष कुलदीप वार्ष्णय यांनी कन्हैयाकुमारची जीभ कापून आणणाऱ्यास ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, तर त्याला गोळ्या घालणाऱ्यास ११ लाख देण्यात येतील, अशी वादग्रस्त पोस्टर राजधानी दिल्लीत लावण्यात आली आहेत. या धमक्यांनंतर दिल्ली पोलीस कन्हैयाच्या सुरक्षेबाबत सतर्क झाले आहेत.
देशविरोधी आणि दहशतवादी अफजल गुरूचे समर्थन करणारा कन्हैया सुटकेनंतर प्रत्येकावर टीका करीत असून, हे कदापि सहन केले जाणार नाही. त्याची जीभ छाटणाऱ्यास आम्ही ५ लाख रुपयांचे बक्षीस देऊ, असे कुलदीप म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याशी पक्षाचा कुठलाही संबंध नसून, त्यांना सहा वर्षांकरिता पक्षातून निष्कासित करण्यात येत असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शाक्य यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले.
दिल्लीत कन्हैयाकुमारविरुद्ध पोस्टर लागल्यामुळे पोलीस त्याच्या सुरक्षेसंदर्भात सतर्क झाले आहेत. प्रेस क्लबच्या भिंतीवर लावण्यात आलेले धमकीचे वादग्रस्त पोस्टरही पोलिसांनी हटविले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. कन्हैयाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्याची सूचना पोलिसांनी विद्यापीठाला केली आहे. तो कुणाला भेटतो, केव्हा बाहेर पडतो आणि कसा प्रवास करतो, यासंदर्भात पूर्वसूचना देण्यात यावी, असे स्पष्ट केले आहे.
प. बंगालमध्ये डाव्या आघाडीचा प्रचार
कन्हैयाला पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी नेण्याचे दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी ठरवले आहे. स्वत: कन्हैया हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचा सदस्य आहे. त्यामुळे तो प्रचाराला जाईल, असे कळते. मात्र त्याला मिळणाऱ्या धमक्या पाहता, त्याच्या फिरण्यावर आता बंधने येणार आहेत. अर्थात त्याला सुरक्षा देण्याची जबाबदारी दिल्ली पोलीस आणि केंद्र सरकारची असल्याचे सांगण्यात येते. (वृत्तसंस्था)
> जेएनयूतून पुन्हा जीना नकोत
वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच रोष ओढवून घेणारे भाजपाचे खासदार योगी आदित्यनाथ आणखी एका वादात अडकले आहेत. जेएनयूत पुन्हा मोहम्मद अली जीना यांचा जन्म होऊ नये आणि झाल्यास त्यांना तेथेच गाडून टाकू, असा इशारा आदित्यनाथ यांनी दिला आहे. ते म्हणाले की, जेएनयूसारख्या संस्थेला देशद्रोह्यांचा अड्डा बनू देणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ तुम्ही देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी व्हावे, असा अजिबात नाही. कन्हैयाला कुठल्या अटींवर जामीन दिला आहे, ते बघावे लागेल.

Web Title: Kanhaiya's tongue cut, put pills!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.