कन्हय्या निर्दोष, उमर खलिदची भूमिका संशयास्पद - दिल्ली सरकारच्या न्यायालयीन समितीचा अहवाल
By admin | Published: March 3, 2016 06:19 PM2016-03-03T18:19:40+5:302016-03-03T18:19:40+5:30
दिल्ली सरकारने नेमलेल्या न्यायालयीन चौकशी समितीला कन्हय्या कुमारने वादग्रस्त भारतविरोधी घोषणा दिल्या नसल्याचे आढळले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - दिल्ली सरकारने नेमलेल्या न्यायालयीन चौकशी समितीला कन्हय्या कुमारने वादग्रस्त भारतविरोधी घोषणा दिल्या नसल्याचे आढळले आहे. जेएनयू कँपसमधल्या त्या वादग्रस्त कार्यक्रमात भारतविरोधी घोषणा दिल्याचा ठपका ठेवत विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हय्या कुमारवर पोलीसांनी देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला होता.
दिल्ली सरकारने नेमलेल्या समितीच्या चौकशीत विद्यापीठाच्या परीसरात भारत विरोधी घोषणा देण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे, आणि त्या संदर्भात ज्या व्यक्तिंनी त्या घोषणा दिल्या त्यापैकी काहींची ओळख पटली आहे. या व्यक्तिंचा ठावठिकाणा शोधायला हवा आणि त्यांच्या सहभागाची चौकशी व्हायला हवी अशी अपेक्षा या समितीने व्यक्त केली आहे.
परंतु कन्हय्या कुमारच्या विरोधात मात्र काही आढळले नसल्याचे या समितीने नमूद केले आहे. 9 फेब्रुवारीच्या त्या कार्यक्रमापासूनचे सात व्हिडीयो प्रयोगशाळेत तपासण्यात आले आणि त्यामधले तीन व्हिडीयो बनावट होते असेही या समितीने म्हटले आहे.
नवी दिल्ली जिल्हा न्यायाधीश संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी करण्यात आली. उमर खलिद खूप व्हिडीयोमध्ये दिसत असून त्याचा अफजल गुरूला व काश्मिरसाठी असलेला पाठिंबा सर्वश्रूत असल्याचे कुमार यांनी म्हटले आहे. उमर खलिदच्या सहभागाची सखोल चौकशी व्हायला हवी अशी अपेक्षा संजय कुमार यांनी व्यक्त केली आहे.