रुग्णांना प्लाझ्मा दान देण्याची कनिका कपूरची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 04:31 AM2020-04-29T04:31:49+5:302020-04-29T04:32:40+5:30
प्लाझमा दान करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर कनिका कपूरला केजीएमयूच्या डॉक्टरांनी बोलावून तिच्या रक्ताचे नमुने घेतले.
लखनौ: कोरोना विषाणूच्या संसर्गातून उपचारानंतर पूर्णपणे बरी झालेली बॉलिवूडची वादग्रस्त गायिका कनिका कपूर हिने आपल्या रक्तातील प्लाझमा कोरोना रुग्णांसाठी दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी तिने आपल्या रक्ताचे नमुने येथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या (केजीएमयू) रुग्णालयात तपासणीसाठी दिले आहेत. प्लाझमा दान करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर कनिका कपूरला केजीएमयूच्या डॉक्टरांनी बोलावून तिच्या रक्ताचे नमुने घेतले. त्या नमुन्यात काही दोष न आढळल्यास तिला प्लाझमा दान करण्यासाठी येत्या सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी रुग्णालयात बोलाविले जाईल, असे केजीएमयूच्या ट्रान्सफ्यूजन मेडिसीन विभागप्रमुख डॉ. तुलिका चंद्रा यांनी सांगितले. केजीएमयूच्या रुग्णालयात उपचार घेऊन पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांपैकी तीन जणांनी याआधी आपल्या रक्तातील प्लाझमा दान केला आहे.