कॅनडाच्या संसदेत दहशतवादी निज्जरला वाहिली श्रद्धांजली; एस जयशंकर संतापले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 04:48 PM2024-06-23T16:48:06+5:302024-06-23T16:49:01+5:30
जयशंकर यांनी खलिस्तानी दहशतवाद्यांनी बॉम्बने उडवलेल्या कनिष्क विमान अपघाताची आठवण करुन दिली.
S Jaishankar on Kanishka Plane Blast :कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरला श्रद्धांजली वाहिल्यानंतर आता भारताकडून प्रतिक्रिया आली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कनिष्क विमान अपघाताचा उल्लेख करुन दहशतवादाच्या मुद्द्यावरून कॅनडाला आरसा दाखवला. आज कनिष्क विमान अपघाताचा (Kanishka Plane Blast) 39वा स्मृतिदिन आहे. यानिमित्त भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी आज त्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. यासोबतच त्यांनी दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दमही कॅनडाला दिला.
एस जयशंकर यांनी X वर केलेल्या एका पोस्टमध्ये लिहिले की, "आज इतिहासातील सर्वात वाईट दहशतवादाच्या कृत्यांपैकी एकाची 39 वा स्मृतिदिन आहे. 1985 मध्ये आजच्याच दिवशी मरण पावलेल्या AI 182 'कनिष्क' च्या 329 प्रवाशांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. ही जयंती आपल्याला याची आठवण करून देते की, दहशतवाद कधीही खपवून घेतला जाऊ नये."
Today marks the 39th anniversary of one of the worst acts of terrorism in history.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) June 23, 2024
Pay my homage to the memory of the 329 victims of AI 182 ‘Kanishka’ who were killed this day in 1985. My thoughts are with their families.
The anniversary is a reminder why terrorism should…
भारतीय वाणिज्य दूतावासाने मृतांना श्रद्धांजली वाहिली
कॅनडाच्या व्हँकुव्हरमध्ये असलेल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने 1985 मध्ये एअर इंडियाच्या कनिष्क विमानात झालेल्या बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे. “भारत दहशतवादाचा मुकाबला करण्यात आघाडीवर आहे आणि या जागतिक धोक्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व देशांसोबत जवळून काम करत आहे,” असे दूतावासाने ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले.
कॅनडाच्या संसदेत 'भारतीय' खासदाराने फोडली डरकाळी
दरम्यान, खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले आहेत. अशातच मंगळवारी(दि.18) निज्जरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कॅनडाच्या संसदेत मौन पाळण्यात आले होते. त्यावरुन एका भारतीय वंशाच्या खासदाराने कॅनडाच्या संसदेतून खलिस्तानी समर्थकांवर जोरदार टीका केली. खासदार चंद्रा आर्य यांनी संसदेला खलिस्तानी दहशतवाद्यांनी कनिष्क विमानाला बॉम्बने उडवल्याचीही आठवण करून दिली.
त्या दिवशी नेमकं काय झालं?
23 जून 1985 रोजी मॉन्ट्रियल, कॅनडातून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अटलांटिक महासागरावरुन उडताना कोसळले होते. कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवाद्यांनी या विमानात बॉम्ब ठेवला होता. या हल्ल्यात 329 लोक मारले गेले, ज्यात 268 कॅनडा, 27 ब्रिटिश आणि 24 भारतीय नागरिकांचा समावेश होता.