कारनं तरुणीला फरफटत नेल्याच्या घटनेची थेट अमित शाहांनी घेतली दखल; दिले महत्वाचे आदेश!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 08:59 PM2023-01-02T20:59:58+5:302023-01-02T21:01:31+5:30
दिल्लीच्या कंझावालामध्ये एका तरुणीला कारनं फरफटत नेल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे.
नवी दिल्ली-
दिल्लीच्या कंझावालामध्ये एका तरुणीला कारनं फरफटत नेल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. ज्या भीषणतेनं तरुणीला कारनं अनेक किलोमीटर फरफटत नेलं ते पाहून प्रत्येकजण स्तब्ध झाला आहे. आता या प्रकरणाची दखल थेट गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली आहे. शाह यांनी दिल्ली पोलिसांनी स्पष्ट सूचना देत संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीनं मागवला आहे. शाह यांच्यावतीनं वरिष्ठ अधिकारी शलिनी सिंह यांना निर्देश देण्यात आलेत की तातडीनं रिपोर्ट तयार केला जावा आणि योग्य ती कारवाई केली जावी.
दिल्लीच्या कंझावालामध्ये रविवारी एका तरुणीचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला होता. शरीराचे बरेचसे भाग फरफटत नेल्यानं तुटले होते. पोलिसांच्या दाव्यानुसार ५ तरुण भरधाव वेगानं कार चालवत होते. त्यांनी संबंधित तरुणी स्कूटरवरुन जात असताना तिला धडक दिली. त्यानंतर तिला १० ते १२ किमीपर्यंत फरफटत नेलं. ज्यात तिचा मृत्यू झाला आहे. दिल्ली पोलिसांनी मृतदेह प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता काही अंतरावर तिची स्कूटर देखील आढळून आली. जी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. स्कूटीच्या नंबरप्लेटच्या मदतीनं तरुणीची ओळख पटवण्यात आली.
आरोपींना अटक करण्यात आली असून या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्री अमित शाह यांनी जातीनं यात लक्ष घातलं आहे. त्यांनी पोलिसांना सविस्तर अहवाल देण्यास सांगितलं आहे.
पोलिसांनी काय सांगितलं?
दिल्ली पोलिसांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन घटनेची माहिती दिली. यात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून दीपक खन्ना नावाचा आरोपी कार चालवत होता. जो ग्रामीण सेवा विभागात कार्यरत आहे. याशिवाय कारमध्ये त्याच्यासोबत अमित खन्ना, कृष्ण, मनोज आणि मिथुन हे इतर चार जण होते. सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुरवांच्या माध्यमातून संपूर्ण घटनेची टाइमलाइन तयार करण्यात येणार आहे. त्याच आधारावर आरोपी नेमकं कुठून आले आणि कुठे जात होते याची माहिती मिळू शकणार आहे. पोलिसांनी सांगितलं की तरुणीला फरफटत नेत असताना ती कारमध्ये अडकली. १० ते १२ किमीपर्यंत ती फरफटत नेलं गेलं. मृतदेहाचा पोस्टमार्टम अहवाल उद्या प्राप्त होईल, असंही पोलिसांनी सांगितलं.