"मोदीजी तुम्ही खूप महागाई केलीय, पेन्सिल-रबरही महाग केलं"; चिमुकलीचं पंतप्रधानांना भावूक पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 12:23 PM2022-08-01T12:23:54+5:302022-08-01T12:28:45+5:30
PM Narendra Modi : इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुकलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना महागाईमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत एक भावनिक पत्र लिहिलं आहे.
नवी दिल्ली - महागाईमुळे सर्वसांमान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती वाढल्याने लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. असं असतानाच आता इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुकलीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) महागाईमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत एक भावनिक पत्र लिहिलं आहे. सोशल मीडियावर सध्या या पत्राची तुफान चर्चा रंगली आहे. "मोदीजी तुम्ही खूप महागाई केलीय, पेन्सिल-रबरही महाग केलं" असं म्हणत तिने 'मन की बात' सांगितली आहे.
कृती दुबे असं या सहा वर्षांच्या मुलीचं नाव असून ती उत्तर प्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यातील छिहरामऊ परिसरात राहते. तिने मोदींना लिहिलेल्या पत्रात "पंतप्रधान जी, माझे नाव कृती दुबे आहे. मी इयत्ता पहिलीत शिकते. मोदीजी तुम्ही खूप महागाई केली आहे. पेन्सिल आणि रबरही महाग केले आहे. आणि मॅगीच्या किंमतीही वाढल्या आहेत. आता पेन्सिल मागितली म्हणून आई मला मारते. मी काय करू? मुलं माझी पेन्सिल चोरतात" असं म्हटलं आहे.
कृतीने हिंदीत लिहिलेलं हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. मुलीचे वडील विशाल दुबे हे वकील आहेत. त्यांनी "ही माझ्या मुलीची 'मन की बात' आहे. नुकतंच तिच्या आईने शाळेत पेन्सिल हरवल्याबद्दल तिला मारले तेव्हा तिला राग आला" असं म्हटलं आहे. अशोक कुमार यांनी सांगितले की, या चिमुकलीच्या पत्राबद्दल त्यांना सोशल मीडियावरून कळले. "मी मुलीला शक्य ती मदत करण्यास तयार आहे आणि तिचे पत्र संबंधित अधिकार्यांपर्यंत पोहोचावे यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन" असे ते म्हणाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.