लस देण्यास वैद्यकीय पथकासोबत तहसीलदार गावात पोहोचले अन् गावकरी पळाले; मग कसं झालं लसीकरण? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 12:02 PM2021-11-15T12:02:34+5:302021-11-15T12:03:11+5:30
कोरोना विरोधी लढ्यात सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे लसीकरण. पण देशातील काही खेड्यापाड्यांमध्ये लसीबाबत अजूनही गैरसमज पसरलेले आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या कन्नोज जिल्ह्यातील तिर्वा कोतवाल क्षेत्रातील अहेर गावात रविवारी पाहायला मिळाला.
कोरोना विरोधी लढ्यात सर्वात प्रभावी शस्त्र म्हणजे लसीकरण. पण देशातील काही खेड्यापाड्यांमध्ये लसीबाबत अजूनही गैरसमज पसरलेले आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या कन्नोज जिल्ह्यातील तिर्वा कोतवाल क्षेत्रातील अहेर गावात रविवारी पाहायला मिळाला. गावात तहसीलदार वैद्यकीय पथकासोबत लसीकरणासाठी पोहोचले. पण वैद्यकीय पथकाला पाहून गावकऱ्यांनी पळ काढण्यास सुरुवात केली तर काहींनी घराचे दरवाजेच लावून घेतले. काही गावकऱ्यांनी तर लस घेणं टाळण्यासाठी थेट शेतात पळ काढला.
गावात एकच शांतता पसरली होती. तहसीलदारांच्या नेतृत्त्वाबाबत आरोग्य विभागाच्या पथकानं जेव्हा लसीकरण सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला. कुणीच लस घेण्यसाठी पुढे यायला तयार नव्हतं. अशावेळी तहसीलदारांना चक्क पोलिसांना पाचारण करावं लागलं. त्यानंतर गावातील मौलवींनी गावातील मशिदीवरुन उदघोषकाच्या सहाय्यानं लोकांना जागरुक करण्याचं काम केलं. त्यानंतर लोक लस टोचून घेण्यास पुढे येऊ लागले.
गावात १२० लोकांचं लसीकरण
पोलीस आणि मौलवींनी पुढाकार घेऊन लोकांना जागरुक केल्यानंतर आरोग्य विभागानं गावातील १२० लोकांना कोरोना विरोधी लसीचा डोस दिला. लसीबाबतची अफवा गावात पसरली होती. त्यामुळे कोणताही गावकरी लस घेण्यास पुढे येत नव्हता. रविवारी अहेर गावात लोकांमध्ये जनजागृतीसाठी तहसीलदार अनिक कुमार सरोज आरोग्य विभागाचे काही सदस्य पोहोचले. तहसीलदारांना पाहून गावकऱ्या थेट घरात पळाले आणि दरवाजे बंद करुन घेतले होते. तर काहीजण शेतात पळून गेले होते.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्याचं दरवाजे ठोठावले आणि लस घेण्यासाठी आग्रह केला. पण एकानाही इच्छा व्यक्त केली नाही. तहसीलदारांना पोलीस बोलवावे लागले. पण पोलिसांना पाचारण करुनही काम झालं नाही. गावकऱ्यांचा विरोध पाहता तहसीलदारांनी मशिदीत जाऊन मौलवींशी बातचित केली आणि त्यांना मशिदीवरील भोंग्यावरुन जनजागृती करण्याचं आवाहन केलं.
कोरोना विरोधी लस घेतल्यानं कोरोना विषाणूचा धोका कसा कमी होतो. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं सारं महत्त्व मौलवींनी गावकऱ्यांना पटवून दिलं. त्यानंतर लोक लस घेण्यास तयार झाले.