बॉक्समध्ये ठेवलेल्या 42 लाखांच्या नोटा भिजल्या, बँकेचा मोठा निष्काळजीपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 10:45 AM2022-09-16T10:45:33+5:302022-09-16T10:53:00+5:30

पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत ठेवलेल्या करन्सी चेस्टमध्ये 42 लाख रुपयांच्या नोटा पाण्यामळे खराब झाल्याचे समोर आले आहे. 

kanpur 42 lakh rupees notes rotted in pnb bank pandu nagar branch vault four officers suspended | बॉक्समध्ये ठेवलेल्या 42 लाखांच्या नोटा भिजल्या, बँकेचा मोठा निष्काळजीपणा

file photo

Next

कानपूर : लोक आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेत ठेवतात. पण, बँका स्वत:कडे ठेवलेल्या नोटा किती जबाबदारीने ठेवतात, याचे एक उदाहरण उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पाहायला मिळाले. शहरातील पांडू नगर येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत ठेवलेल्या करन्सी चेस्टमध्ये 42 लाख रुपयांच्या नोटा पाण्यामुळे भिजल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, 3 महिन्यांपूर्वी या नोटा बँकेत एका बॉक्समध्ये ठेवण्यात आल्या होत्या. यादरम्यान काही कारणाने बॉक्समध्ये पाणी गेले. त्यावेळी बँक कर्मचार्‍यांनी बॉक्समधील सर्वात वरच्या नोटा पाहिल्या, परंतु खालच्या बाजूला ठेवलेल्या नोटा त्यांनी पाहिल्या नाहीत. त्यामुळे पाण्यामुळे बॉक्समधील भिजलेल्या नोटा सुकलेल्या असतील, असे त्यांना वाटले.

सूत्रांनी सांगितले की, बँकेच्या तिजोरीत जागाच शिल्लक नव्हती. रोकड वाढली की नोटा बॉक्समध्ये भरून भिंतीजवळ ठेवल्या जात होत्या. याठिकाणी पावसात तळघराची भिंत ओलसर झाल्याने बॉक्समध्ये पाणी शिरले. त्यानंतर बराच वेळ बॉक्सकडे बँक कर्मचाऱ्यांनी पाहिले नाही, त्यामुळे 42 लाख रुपयांच्या नोटा भिजून खराब झाल्या. 

या घटनेनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) पथक पाहणीसाठी दाखल झाले. तपास सुरू झाल्यावर हे प्रकरण वरील अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले. त्यासाठी पुन्हा दुसरे पथक तयार करण्यात आले. या तपासानंतर पंजाब नॅशनल बँकेच्या दक्षता पथकानेही तपास सुरू केला. तसेच, नोटांची देखरेख का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

तपास अहवाल आल्यानंतर याप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पांडू नगर शाखेच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केले. ज्यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक देवीशंकर, व्यवस्थापक आसाराम, चेस्ट ऑफिसर राकेश कुमार आणि वरिष्ठ व्यवस्थापक भास्कर कुमार भार्गव यांचा सहभाग आहे. देवीशंकर यांनी 25 जुलै रोजीच पांडू नगर शाखेत काम हाती घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तर नोटा भिजल्याची घटना त्यांच्या येण्यापूर्वीच घडली होती. 

या घडलेल्या घटनेबातत सध्या पंजाब नॅशनल बँकेकडून कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या सर्कल हेडला फोन केला असता त्यांनी फोन घेतला नाही.

Web Title: kanpur 42 lakh rupees notes rotted in pnb bank pandu nagar branch vault four officers suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.