लव्ह मॅरेजनंतर शिकवलं, नोकरी लावली पण बायकोच सोडून गेली, नवऱ्याने मांडली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 02:52 PM2024-09-05T14:52:51+5:302024-09-05T14:53:05+5:30
शिवांशू अवस्थी आणि मीनाक्षी शुक्ला यांनी २००८ मध्ये लग्न केलं. आता लग्नाच्या १५ वर्षानंतर ते वेगळे झाले आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लव्ह मॅरेजनंतर पत्नीला शिकवलं. तिचं स्वप्न पूर्ण केलं. सरकारी नोकरी लावली पण नंतर पत्नीच सोडून गेल्याची घटना घडली आहे. कानपूरमध्ये राहणाऱ्या शिवांशू अवस्थी आणि मीनाक्षी शुक्ला यांनी २००८ मध्ये लग्न केलं. आता लग्नाच्या १५ वर्षानंतर ते वेगळे झाले आहेत. या दोघांना दोन मुलं आहेत.
शिवांशू सांगतो की, त्याची पत्नी मीनाक्षीची मोठी स्वप्न होती. पुढे शिक्षण घेऊन सरकारी नोकरी करण्याची इच्छा तिने व्यक्त केली. अशा परिस्थितीत त्याने पत्नीला शिक्षण पूर्ण करायला दिलं. २०१५ मध्ये तिला सरकारी शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. पण सरकारी नोकरी मिळताच मीनाक्षी बदलली, असा आरोप आहे. तुझी आई आजारी आहे, तिची काळजी घेण्यासाठी नोकर ठेव, असं सांगून तिने शिवांशूच्या घरी राहण्यास नकार दिला.
पती-पत्नीमध्ये यावरून बराच वाद झाला होता. शेवटी मीनाक्षी घरातून निघून गेली. तिने तिच्या लहान मुलालाही सोबत नेलं. मोठा मुलगा (१३) शिवांशूसोबत राहिला. मीनाक्षीनेही आपल्या मोठ्या मुलाच्या ताब्यासाठी न्यायालयात अर्ज केला. याशिवाय शिवांशूविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. शिवांशू सांगतो की, त्याने पत्नीला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला पण ती आली नाही.
मीनाक्षी इटावामध्ये राहायला लागली आणि तिथे काम करू लागली. नंतर औरैयामध्ये बदली झाली. वैतागलेल्या शिवांशूने घटस्फोटाची केस दाखल केली. या प्रकरणात मीनाक्षी तारखेला आली नाही. त्यामुळे शिवांशूने एकतर्फी घटस्फोटाचे आवाहन केलं. सुनावणीनंतर न्यायालयाने शिवांशूची एकतर्फी घटस्फोटाची याचिका स्वीकारली. शिवांशूच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने हे मान्य केलं आहे की, हे जोडपं अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाही आणि पत्नीही येत नाही, त्यामुळे पतीकडे घटस्फोट घेण्याचं कारण आहे.