100 कोटींच्या जुन्या नोटा लपवणा-या 'त्या' ला 483 कोटी रूपयांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 01:28 PM2018-01-19T13:28:22+5:302018-01-19T13:55:28+5:30
कानपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी केलेल्या छापेमारीत जवळपास 100 कोटी रूपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. यामध्ये व्यापारी आनंद खत्री याच्यासह 16 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. याप्रकरणी आनंद खत्री याला दंडाच्या स्वरूपात तब्बल 483 कोटी रूपये
कानपूर : कानपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी केलेल्या छापेमारीत जवळपास 100 कोटी रूपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. यामध्ये व्यापारी आनंद खत्री याच्यासह 16 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. याप्रकरणी आनंद खत्री याला दंडाच्या स्वरूपात तब्बल 483 कोटी रूपये भरावे लागू शकतात.
उत्तर प्रदेश पोलिसांनी आनंद खत्रीच्या विरोधात भारतीय दंड विधान आणि स्पेसीफाइड बॅंक नोट्स अॅक्ट 2017 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानुसार व्यवहारातून बाद केलेल्या नोटा बाळगल्याप्रकरणी तुरूंगवासासोबतच जप्त केलेल्या रकमेच्या पाचपट आयकर भरावा लागतो. दंड भरण्यास सक्षम नसल्यास संपत्ती जप्त करण्याचीही तरतूद यामध्ये आहे. यानुसार खत्रीकडे सापडलेल्या 96.62 कोटींच्या नोटांसाठी त्याला 483.1 कोटी रूपये दंड भरावा लागू शकतो.
टक्केवारीवर नफा घेवून खत्री नोटा बदलून द्यायचा. पोलीस आणि एनआयएच्या पथकाने मंगळवारी 3 ते 4 हॉटेल्स आणि बांधकाम सुरू असणाऱ्या परिसरात छापेमारी केली. यावेळी स्वरूप नगर परिसरातील एका बंद घरात मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा सापडल्या. घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये तीन गाद्यांमध्ये लपवण्यात आलेल्या 500 - 1000 च्या जुन्या नोटा पाहून पोलिसही अवाक झाले. यामागे जुन्या नोटा बदलून देणारं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाचं कनेक्शन दहशतवादी संघटनांशी जोडण्यास पोलिसांनी नकार दिला. आरोपी आनंद खत्री श्रीमंत घरातील आहे. तो 20 ते 25 टक्के नफा घेऊन तो या नोटा बदलून देतो असं लोकांना सांगायचा. पण त्याला ज्या ठिकाणाहून नोटा बदलवायच्या होत्या त्यामध्ये अपयश आल्याने घरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा जमा होत गेल्या. कानपूर पोलीस या सगळ्या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.