बापरे! 24 तासांत 16, एका आठवड्यात 108 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू; कानपूरमध्ये घडतंय काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 04:57 PM2023-01-09T16:57:03+5:302023-01-09T16:57:38+5:30
हृदयरोग संस्थेत 500 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या आठवडाभरात हृदयविकाराच्या झटक्याने 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये थंडीची लाट कायम आहे. तापमान 2 अंशांवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत वाढत्या थंडीमुळे लोक आजारी पडत आहेत. या कडाक्याच्या थंडीत हृदयासंबंधीत आजार असलेल्या रुग्णांना मोठा त्रास होत आहे. हृदयविकाराच्या झटक्याने लोकांचा मृत्यू होत असल्याची परिस्थिती आहे. कानपूरच्या हृदयरोग संस्थेचे आकडे तेच सांगत आहेत की शहरात रुग्णांचा सतत मृत्यू होत आहे. दररोज 600 हून अधिक रुग्ण ओपीडीमध्ये दाखल होत आहेत.
हृदयरोग संस्थेत 500 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या आठवडाभरात हृदयविकाराच्या झटक्याने 108 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या मृत्यूंची आकडेवारी कानपूर हार्ट डिसीज इन्स्टिट्यूट (LPS हार्ट डिसीज सेंटर) मधूनच समोर येत आहे. ग्रामीण भागातील इतर सीएचसी रुग्णालये आणि सरकारी रुग्णालयांची आकडेवारी यात समाविष्ट नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बीपीचे रुग्ण आणि वृद्धांना हिवाळ्यात जास्त त्रास होतो.
कानपूरच्या हृदयरोग संस्थेने अशा परिस्थितीत एक नियंत्रण कक्ष सुरू केला आहे आणि एक हेल्पलाइन नंबर जारी करून लोकांना मदत करण्याचा मार्ग तयार केला आहे, जेणेकरून लोकांचे प्राण वाचू शकतील. थंडीत लोकांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे हृदयरोग संस्थेचे संचालक डॉ. कृष्ण यांनी म्हटलं आहे. स्वतःला उबदार कपड्यांनी झाकून ठेवा आणि गरज असेल तेव्हाच ज्येष्ठांना घराबाहेर काढा. हृदयरोग्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
कार्डिओलॉजी मॅनेजरच्या आकडेवारीनुसार 1 जानेवारी 2023 ते 8 जानेवारी या कालावधीत हृदयविकाराच्या झटक्याने 108 रुग्णांचा मृत्यू झाला. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, रुग्णालयात उपचारादरम्यान 51 रुग्णांचा मृत्यू झाला आणि 57 रुग्ण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत झाले होते. कानपूरच्या हृदयरोग संस्थेचे संचालक डॉ. कृष्णा म्हणाले की, संस्थेचे डॉक्टर आणि कर्मचारी सातत्याने रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यामुळेच जीव वाचवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"