धक्कादायक! कुटुंबाने 17 महिने केली मृतदेहाची सेवा; मृत्यूनंतर खर्च केले तब्बल 30 लाख अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 03:28 PM2022-09-26T15:28:46+5:302022-09-26T15:30:06+5:30
जेव्हा संपूर्ण कुटुंब 17 महिने मृतदेह घरात ठेवून त्याला बरे करण्याचा प्रयत्न करत असल्याची बाब समोर आली तेव्हा सर्वच हैराण झाले.
उत्तर प्रदेशमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विमलेश दीक्षित नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी तो जिवंत आहे असं समजून तब्बल 17 महिने त्याचा मृतदेह हा घरामध्येच ठेवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. 23 सप्टेंबर 2022 रोजी हा भीषण प्रकार सर्वांच्या समोर आला आणि शेजाऱ्यांसह नातेवाईकांनाही मोठा धक्का बसला. जेव्हा संपूर्ण कुटुंब 17 महिने मृतदेह घरात ठेवून त्याला बरे करण्याचा प्रयत्न करत असल्याची बाब समोर आली तेव्हा सर्वच हैराण झाले.
कुटुंबीयांनी विमलेशच्या उपचारासाठी तब्बल 30 लाख रुपये खर्च केले आणि हे सर्व उपचाराच्या नावाखाली करण्यात आलं. एप्रिल 2021 मध्ये विमलेशचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला घरी आणले आणि त्याच्या हृदयाचे ठोके सुरू असल्याचे सांगून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले नाहीत. घरीच उपचार सुरू झाले. 4 दिवसात ऑक्सिजनसाठी कुटुंबाचे 9 लाख रुपये खर्च झाले. कोरोनाच्या काळात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा असल्याने नातेवाईकांनी प्रत्येकी एक लाख रुपये किमतीने ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केले होते.
कानपूरच्या खासगी रुग्णालयातही सुरू होते उपचार
विमलेशच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 एप्रिल 2021 नंतर जेव्हा त्याला मृत घोषित करण्यात आले, त्यानंतर दीड महिना लखनऊच्या पीजीआयनेही त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेले, पण कोरोनामुळे तो हॉस्पिटलमध्ये दाखलही करून घेतलं नाही. त्यानंतर कानपूरमधील कल्याणपूर आणि बारा येथील खासगी रुग्णालयानेही विमलेशचा मृतदेह उपचारासाठी घेतला आणि त्यासाठी मोठी रक्कमही घेतली.
6 महिने डॉक्टरांनी घरीच केले उपचार
विमलेशच्या कुटुंबीयांनी असेही सांगितले की, 6 महिन्यांपासून डॉक्टर विमलेशवर घरीच उपचार करत होते. विमलेशला ग्लुकोज दिलं जात होतं. रेमडेसीविर इंजेक्शन विकत घेऊन ते दिलं आणि सहा महिन्यांनंतर नस न मिळाल्याने पुढचे उपचार नाकारले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सध्या पोलीस आयुक्तांनी तीन सदस्यीय तपास पथकाची स्थापना केली आहे. 17 महिने मृतदेह घरात कसा ठेवला याची चौकशी ही टीम करणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.