अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 14:22 IST2024-11-01T14:16:04+5:302024-11-01T14:22:22+5:30
दिवाळीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली, देवघरात असलेल्या दिव्यामुळे आग लागली.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दिवाळीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली, देवघरात असलेल्या दिव्यामुळे आग लागली. या आगीत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. आगीमुळे घरात धुराचे लोट पसरले होते, त्यामुळे पती-पत्नी आणि मोलकरणीचा गुदमरून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच घरातील पाळीव मांजराचाही मृत्यू झाला.
मृतांमध्ये काकादेवच्या पांडू नगर येथील रहिवासी बिस्कीट व्यावसायिक संजय श्याम दसानी, पत्नी कनिका दसानी आणि मोलकरीण छवी यांचा समावेश आहे. दिवाळीच्या दिवशी तीन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक रात्रीच घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. त्यानंतर घरातील लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काल रात्री घडली. संजय श्याम दसानी (48) हे त्यांची पत्नी कनिका श्याम दसानी आणि घरातील मोलकरीण छवी चौहान यांच्यासोबत पांडू नगर येथील एका घरात राहत होते. दिवाळीच्या दिवशी पूजेनंतर कुटुंबीय देवघरात दिवा लावून झोपले होते. मात्र याच दरम्यान अचानक आग लागली. त्यामुळे तिघांना जीव गमवावा लागला.
ही आग संपूर्ण खोलीत पसरली, असं सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर घरात धुराचे लोट पसरले, त्यामुळे तिघांचाही गुदमरून मृत्यू झाला. रात्री १२ वाजल्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांसह अग्निशमन दल आणि फॉरेन्सिक टीमही तेथे होती. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.