२६ किलो सोनं, साडे चार कोटींची रोकड; व्यावसायिकाच्या घरात घबाड सापडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 02:46 PM2023-10-08T14:46:35+5:302023-10-08T14:56:56+5:30
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये मयूर ग्रुपवर आयकर विभागाची कारवाई चौथ्या दिवशीही सुरूच होती. दीडशे अधिकाऱ्यांनी ३५ ठिकाणी छापे टाकले.
उत्तर प्रदेशातील कानपूर येथील मयूर ग्रुपवर आयकर विभागाची छापेमारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. आतापर्यंत सुमारे ८ कोटी रुपयांचे २६ किलो सोने आणि ४.५ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यासोबतच ४१ कोटी रुपयांची SAFTA फी चोरीही उघडकीस आली आहे. या संपूर्ण कारवाईत अनेक अनियमितता आणि करचोरी उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५० अधिकाऱ्यांनी ३५ हून अधिक ठिकाणी ही कारवाई केली, यामध्ये एकूण २६.३०७ किलो वजनाचे दागिने सापडले. त्यापैकी १५.२१७ किलोग्राम जप्त करण्यात आले आहे. त्यांची किंमत सुमारे ८ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय ४.५३ कोटी रुपयांची रोकड सापडली असून त्यापैकी ३.७ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. साउथ एशियन फ्री ट्रेड एरिया (SAFTA) मध्ये ४१ कोटी रुपयांची ड्युटी चोरीही आढळून आली आहे. याबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रुप मालकाची अनेक तास चौकशी केली. याशिवाय M/S KPEL कडून १८ कोटी रुपयांची बनावट खरेदी उघडकीस आली. या संदर्भात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांसह समूहाच्या मालकाची चौकशी केली.
अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, रोख रक्कम आणि सोने वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले होते. त्या सर्व खोल्यांच्या चाव्या अशा ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या की, अधिकाऱ्यांना त्या शोधणे कठीण झाले होते. ज्या खोलीत जास्तीत जास्त रोकड सापडली त्या खोलीची चावी फ्लॉवर पॉटमध्ये लपवून ठेवलेली सापडली. डेटा राखण्यासाठी हायटेक सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला. मयूर ग्रुपने डेटा राखण्यासाठी हायटेक सॉफ्टवेअरचा वापर केला आहे, जो इन्कम टॅक्स विभागाच्या फॉरेन्सिक टीमने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे.
जप्त केलेला लॅपटॉप आणि इतर उपकरणांची तपासणी करण्यात येत आहे. यानंतर इतर करचोरी आणि अनियमिततेचा तपशील समोर येईल. आयकर सूत्रांच्या माहितीनुसार, हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक रिअल इस्टेटमध्ये करण्यात आली. करचुकवेगिरीसाठी बोगस खरेदी करण्यात आली. ज्या कंपन्यांकडून कोट्यवधींची खरेदी दाखविली जाते त्या प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत. हे छापे आणखी एक-दोन दिवस सुरू राहतील, असंही सांगण्यात येत आहे.