कानपूरमध्ये कालिंदी एक्सप्रेस उडवण्याचा कट; रुळावर ठेवलेल्या LPG सिलेंडरला ट्रेनची धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 09:32 AM2024-09-09T09:32:17+5:302024-09-09T09:33:24+5:30
कानपूरमध्ये महिनाभरात रेल्वे अपघात घडवण्याचा आणखी एक कट उघडकीस आला आहे.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये महिनाभरात रेल्वे अपघात घडवण्याचा आणखी एक कट उघडकीस आला आहे. रविवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास प्रयागराजहून भिवानीकडे जाणाऱ्या कालिंदी एक्स्प्रेसची रेल्वे लाईनवर ठेवलेल्या भरलेल्या एलपीजी सिलेंडरशी धडक झाली. १७ ऑगस्ट रोजी रात्री २.३० च्या सुमारास साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले. रेल्वेने हा अपघात म्हणजे कट असल्याचं म्हटलं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर रोजी रात्री८.३० च्या सुमारास कालिंदी एक्स्प्रेस अनवरगंज-कासगंज रेल्वे मार्गावर बर्राजपूर आणि बिल्हौर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर ठेवलेल्या भरलेल्या एलपीजी सिलेंडरला धडकली. लोको पायलटने सांगितलं की, त्याला ट्रॅकवर काही संशयास्पद वस्तू दिसली आणि त्यानंतर त्याने ब्रेक लावला, पण तरीही ती वस्तू ट्रेनला धडकली आणि मोठा आवाज झाला. चालकाने ट्रेन थांबवली आणि गार्ड आणि इतर लोकांना याची माहिती दिली.
या घटनेचा तपास करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि इतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या असून तपास सुरू केला आहे. एटीएसचं कानपूर आणि लखनौ युनिट घटनास्थळी पोहोचले आणि पुरावे गोळा केले. घटनेची माहिती मिळताच अनवरगंज स्थानकाचे रेल्वे अधीक्षक, आरपीएफ आणि इतर रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी तपास केला असता, पोलिसांना झुडपात सिलिंडर, पेट्रोलने भरलेली बॉटल, माचिस असे अनेक घातक पदार्थ आढळून आले.
अर्धा तास थांबल्यानंतर गाडी रवाना करण्यात आली. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी येऊन तपास केला. सर्व संशयास्पद वस्तू तपासासाठी पाठवण्यात आल्या आहेत. घटनास्थळी पोहोचलेले अतिरिक्त आयुक्त हरीश चंद्र यांनी हे कृत्य कोणी केले असेल त्याला पकडण्याचा प्रयत्न केला जाईल, असं सांगितलं. सध्या सर्वच ठिकाणी तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीमही तपशीलवार आढावा घेत आहे.