बकऱ्याच्या जागी कुत्रा ठेवला; भुंकल्यानंतर व्यापाऱ्याचे डोळे उघडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 04:15 PM2018-08-21T16:15:15+5:302018-08-21T17:59:59+5:30
कानपूर : उत्तर प्रदेशमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका बकरा विक्रेत्याला आपल्याकडील कुत्रा देऊन त्या बदल्यात खराखुरा बकरा नेल्याचा प्रकार नुकताच घडला. मात्र, काही वेळाने कुत्र्याने आपले खरे रुप दाखविल्याने व्यापाऱ्याला आपण फसले गेल्याचे समजले. यानंतर व्यापाऱ्याने थेट पोलिस ठाणे गाठले.
कानपुरच्या जाजमऊ मंडईमध्ये अशरफ हा व्यापारी काही बकरे घेऊन विक्रीसाठी आला होता. हा परिसर गर्दीचा असल्याने याचा फायदा उठवत एका भामट्याने अशरफच्या हातातील एका बकऱ्याची दोरी आपल्या हातात घेतली व काही वेळात पुन्हा अशरफच्या हातात परत दिली.
गर्दी असल्याने अशरफने फारसे लक्ष दिले नाही. मात्र, काहीवेळाने मागुन भुंकण्याचा आवाज आल्याने अशरफने पाठीमागे पाहिले तर काय त्याच्याकडील बकऱ्याऐवजी कुत्रा बांधलेला दिसला. अशरफला ही बाब समजेपर्यंत भामट्याने तेथून बकरा घेऊन पळ काढला होता. यानंतर अशरफ याने पोलिसांना याबाबतची माहिती दिली.
पोलिसांनी सांगितले की, आम्हाला या कथित घटनेची माहिती मिळाली. पोलीस सांगितलेल्या ठिकाणी जाऊनही आले. मात्र, तो विक्रेता त्या ठिकाणी सापडला नाही. कोणीतरी गंमत केल्याची शक्यता आहे.