रोटोमॅक पेन आठवतोय? चार कंपन्यांचा एकच कर्मचारी, तोच सीईओ; मोठा घोटाळा उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 02:56 PM2022-09-22T14:56:49+5:302022-09-22T16:41:30+5:30
चार कंपन्यांसोबत 26,000 कोटींचा व्यवसाय, बँकांनी दिले 2100 कोटींचे कर्ज; CBIने उघडकीस आणला मोठा घोटाळा.
कानपूर: सीबीआयने (CBI) कानपूरमध्ये एक मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे. रोटोमॅक कंपनीने चार कंपन्यांसोबत 26000 कोटींचा व्यवसाय केला, विशेष बाब म्हणजे या चारही कंपन्यांचा पत्ता एकच असून, त्यात कर्मचारीही एकच आहेत. एक कर्मचारी असलेल्या कंपन्यांसोबत व्यवसाय करुन रोटोमॅकने बँकांकडून 2100 कोटी रुपयांचे कर्ज कसे मिळवले, याचा तपास सीबीआय करत आहे.
चार कंपन्या एक कर्मचारी
रोटोमॅकने फक्त चार कंपन्यांसोबत 26143 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचे तपासात समोर आले आहे. या कंपन्यांचा पत्ताही एकच असून, तो पत्ता म्हणजे 1500 स्क्वेअर फुटांचा एक हॉल आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या चारही कंपन्यांमध्ये एकच कर्मचारी काम करतो. तोच कंपनीचा सीईओदेखील आहे. या कंपन्यांसोबत कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय सुरू असल्याच्या आधारे बँकांनी रोटोमॅकला 2100 कोटी रुपयांचे कर्जही दिले होते.
PNB बँकेची पोलिसांत तक्रार
सीबीआयचा आरोप आहे की, संचालक विक्रम कोठारी(मृत्यू झाला) आणि राहुल कोठारी यांनी इतरांसह मिळून, बँलेंसशीटमध्ये फेरफार केली आणि बँकांकडून कर्ज घेतले. पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीवरून सीबीआयने रोटोमॅक ग्लोबलचे संचालक राहुल कोठारी, साधना कोठारी आणि अज्ञात अधिकाऱ्यांविरुद्ध 93 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला आहे.
आपलाच माल खरेदी करायची कंपनी
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, रोटोमॅक ग्रुपसोबत व्यवसाय करणाऱ्या चार कंपन्या रोटोमॅकचे सीईओ राजीव कामदार यांचा भाऊ प्रेमल प्रफुल कामदार यांच्या मालकीच्या आहेत. रोटोमॅकने या चार कंपन्यांना कागदावरच उत्पादने निर्यात केली. या सर्व कंपन्या बंज ग्रुपकडून रोटोमॅकला माल विकत होत्या, म्हणजेच माल बनवणारी कंपनीच आपला माल खरेदी करत होती.
या चार कंपन्यांच्या नावे व्यवसाय
मॅग्नम मल्टी-ट्रेड, ट्रायम्फ इंटरनॅशनल, पॅसिफिक युनिव्हर्सल जनरल ट्रेडिंग आणि पॅसिफिक ग्लोबल रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड अशी या चार कंपन्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे 26000 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचे 1500 स्क्वेअर फूटमध्ये एकच कार्यालय होते. पीएनबीच्या तक्रारीवरून मंगळवारी एक नवीन एफआयआर नोंदवण्यात आला. उत्पादक कंपनीच आपला माल खरेदी करायची, अशी माहिती तबासात समोर आली.
एका कर्मचाऱ्याने व्यवसाय सांभाळला
26 हजार कोटींचा व्यवसाय दाखवणाऱ्या चार कंपन्यांमध्ये एकच कर्मचारी असल्याचे सीबीआयच्या तपासात उघड झाले असून, त्याचे नाव प्रेमल प्रफुल्ल कामदार आहे. 1500 स्क्वेअर फुटांच्या खोलीत बसून तो लोडिंग, अनलोडिंगपर्यंतची सर्व कामे करत होता. अशा कंपनीकडून व्यवसायाच्या आधारे बँकांनी 2100 कोटी रुपयांचे कर्ज दिलेच कसे? असा प्रश्न सीबीआयला पडला. त्यामुळेच बँक अधिकारीदेखील संशयाच्या भोवऱ्यात आहेत.