लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 13:06 IST2025-04-23T13:06:08+5:302025-04-23T13:06:42+5:30
नवऱ्याच्या अचानक मृत्यूने पत्नीला धक्का बसला आहे. शुभमचे वडील कानपूरमध्ये सिमेंटचा व्यवसाय करतात. बुधवारी शुभम जम्मू काश्मीरवरून परतणार होता.

लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
pahalgam terror attack: २ महिन्यापूर्वी शुभम द्विवेदीनं नव्या वैवाहिक आयुष्याची सुरूवात केली होती. शेरवानी घालून घोड्यावर बसून स्टेजवर नाचत नाचत पत्नी ऐशान्याचा हात हाती घेतला होता. लग्नातील हे सर्व क्षण कॅमेऱ्यात कैद झाले. प्रत्येक फोटोत त्याचे हास्य दिसून येत होते. परंतु कुणास ठाऊक अवघ्या २ महिन्यातच हे फोटो पाहून कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू वाहतील. एक हसता खेळता चेहरा दहशतवाद्याच्या गोळीच्या निशाण्यावर आला. सोशल मीडियात शुभम आणि ऐशान्या यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.
लाल लहंगा घातलेली नवरी, डोक्यावर मुंडावळ्या बांधलेला नवरा, फुलांनी सजवलेला मंडप आणि त्यात शुभमच्या डोळ्यातील ती चमक हे पाहून शुभमच्या घरच्यांना अश्रू अनावर होत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर शुभम द्विवेदीच्या चुलत भावाने सांगितले की, दहशतवाद्यांनी भावाला गोळी मारल्याची माहिती वहिनीनं दिली. भाऊ-वहिनी मॅगी खात होते, अचानक पोलीस गणवेशात काही जण आले, त्यांनी तुम्ही मुस्लीम आहात का विचारले, जर आहात तर कलमा बोलून दाखवा सांगितले. उत्तर दिले नाही म्हणून गोळी झाडून हत्या करण्यात आली. सरकारने या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिले पाहिजे असं त्याने मागणी केली.
नवऱ्याच्या अचानक मृत्यूने पत्नीला धक्का बसला आहे. शुभमचे वडील कानपूरमध्ये सिमेंटचा व्यवसाय करतात. बुधवारी शुभम जम्मू काश्मीरवरून परतणार होता. परंतु त्याच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबात शोककळा पसरली. दहशतवाद्यांनी ज्यारितीने शुभमला मारले त्यांनाही असेच उत्तर द्या अशी मागणी कुटुंबीय करत आहेत.
कटामध्ये तिघांचा समावेश, कोण आहे मास्टरमाईंड?
पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा पुरस्कृत द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेच्या दहशतावाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्याचा तपास आता सुरू करण्यात आला असून, हल्ल्यातील मास्टरमाईंडबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांच्या तपासानुसार द रेझिस्टन्स फ्रंटचा म्होरक्याने पूर्वनियोजितपणे हा हा हल्ला केला आहे. यात पाकव्याप्त काश्मिरातील दोन अतिरेक्यांचाही समावेश आहे. द रेझिस्टन्स फ्रंटच्या कमांडर सैफुल्लाह कसुरी ऊर्फ खालीद हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. त्यांने पाकव्याप्त काश्मिरातील दोन दहशतवाद्यांच्या मदतीने या हल्ल्याचा कट रचला असं समोर आले आहे.