शाब्बास पोरांनो! कायद्याचं शिक्षण घेऊन ११ वर्षांनी वडिलांची केली निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 19:43 IST2024-12-12T19:42:38+5:302024-12-12T19:43:20+5:30
एका व्यक्तीने ११ वर्षे जेलमध्ये काढली. पण आता त्यांच्या मुलांनी धडपड करून वडिलांना न्याय मिळवून दिला आहे.

फोटो - ABP News
कानपूरमधील एका व्यक्तीने ११ वर्षे जेलमध्ये काढली. पण आता त्यांच्या मुलांनी धडपड करून वडिलांना न्याय मिळवून दिला आहे. कायद्याचं शिक्षण घेऊन ११ वर्षांनी वडिलांची निर्दोष मुक्तता केल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. वडील जेलमध्ये गेले तेव्हा मुलं लहान होती. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वडिलांची सुटका करता आली नाही.
आपल्या वडिलांची निर्दोष मुक्तता व्हावी आणि त्यांना जेलमधून लवकर बाहेर काढता यावं यासाठी दोन्ही मुलांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला, शिक्षणं घेतलं. एवढंच नाही तर पदवी घेतल्यानंतर वडिलांची केस लढवली आणि खोट्या सामूहिक बलात्कार प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता केली. कानपूरच्या बिथूर पोलीस स्टेशन परिसरातील हे प्रकरण आहे.
२०१३ मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये अनिल गौर यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने शेतीवरून झालेल्या वादामुळे जेलमध्ये टाकलं. त्याच्यावर सामूहिक बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. त्यामुळे अनिल यांना खोट्या खटल्यात जेलमध्ये जावं लागलं. पती जेलमध्ये गेल्यावर पत्नी एकटी पडली. तिने पतीसाठी घरोघरी मदत मागितली, पण काहीच फायदा झाला नाही.
दोन्ही मुलं घरातील परिस्थिती पाहत होते. पण पैसे नसल्यामुळे वकील देखील त्यांची केस घेत नव्हते. याच दरम्यान मुलं मोठी होत असताना त्यांनी वडिलांची निर्दोष मुक्तता करण्यासाठी कायद्याचं शिक्षण घेतलं. अनिल यांची मुलगी उपासना आणि मुलगा ऋषभ वकील झाले. त्यांनी आपल्या वडिलांसाठी आयुष्यातील पहिली केस लढली आणि ११ वर्षांनंतर कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
सामूहिक बलात्काराच्या आरोपातून निर्दोष सुटल्यानंतर आणि जेलमधून बाहेर आल्यानंतर अनिल गौर म्हणाले की, त्यांची मुलं त्यांच्यासाठी देवदूतापेक्षा कमी नाहीत. देव प्रत्येकाला त्यांच्यासारखीच मुलं देवो. तर मुलांनी सांगितलं की, गेल्या ११ वर्षांत अनेक समस्या जवळून पाहिल्या आहेत. घरात पैसे नव्हते आणि पैशांअभावी वकील कोणतंही काम करत नव्हते. म्हणूनच निश्चय केला की, आता आपणच आपल्या वडिलांची निर्दोष मुक्तता करून त्यांना जेलमधून बाहेर काढू.