Kanpur Violence: दंगलखोरांमध्ये घबराट; कानपूर हिंसाचाराचा तपास 'या' एनकाउंटर स्पेशलिस्टच्या हातात...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2022 01:56 PM2022-06-05T13:56:57+5:302022-06-05T13:57:24+5:30
Kanpur violence: कानपूरमधील हिंसाचार आणि दगडफेकीच्या घटनेनंतर 500 लोकांवर गुन्हे दाखल तर 24 जणांना अटक.
Kanpur violence: कानपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, सीएम योगी यांनी एन्काउंटर स्पेशालिस्ट IPS अजय पाल शर्मा यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी दिली आहे. कानपूरला पोहोचल्यानंतर अजय पाल शर्मा यांनी प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू केला असून, दंगलखोरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शर्मा डायल 112 एसपी म्हणून तैनात
अजय पाल शर्मा हे सध्या डायल 112 एसपी म्हणून तैनात आहेत. त्यांनी यापूर्वी उत्तर प्रदेशातील हाथरस, नोएडा, शामली, रामपूर या जिल्ह्यांचे नेतृत्व केले आहे. कानपूरला पोहोचताच त्यांनी पोलीस आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांची भेट घेऊन घडामोडींवर चर्चा केली. आयपीएस अजय पाल शर्मा या संपूर्ण प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अजय पाल शर्मा यांनी यापूर्वी लखीमपूर खेरी प्रकरणातही योग्य कारवाई केली आहे.
500 जणांवर गुन्हे दाखल
कानपूरमधील हिंसाचार आणि दगडफेकीच्या घटनेच्या एका दिवसानंतर, उत्तर प्रदेशपोलिसांनी शनिवारी 500 लोकांवर गुन्हे दाखल केले. हिंसाचाराच्या घटनांमध्ये 40 जण जखमी झाले आहेत. हिंसाचारग्रस्त भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून सध्या शांततेचे वातावरण आहे.
24 जणांना अटक
कानपूरचे पोलीस आयुक्त विजय सिंह मीना यांनी पत्रकारांना सांगितले की, या घटनेशी संबंधित 24 जणांना अटक करण्यात आली आहे. शुक्रवारच्या हिंसाचारप्रकरणी शनिवारी पोलिसांनी आणखी सहा जणांना अटक केली. मीना म्हणाले, 'आम्ही सीसीटीव्ही फुटेज आणि घटनांच्या इतर व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या मदतीने हिंसाचारात सहभागी असलेल्या एकूण 36 लोकांना ओळखले आहे. आतापर्यंत एकूण 24 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी 18 जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली.