अस्सं सासर सुरेख बाई! मुलगा गेल्यावर सासू-सासऱ्यांनी लावलं सुनेचं दुसरं लग्न; केलं कन्यादान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 04:43 PM2023-03-21T16:43:52+5:302023-03-21T16:47:47+5:30
सासू-सासऱ्यांनी आपल्या सुनेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सासू-सासऱ्यांनी आपल्या तरुण विधवा सुनेचं कन्यादान केल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील धारच्या खुटपला या छोट्याशा गावात सासू-सासऱ्यांनी आपल्या सुनेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर, त्यांनी आपल्या सुनेला नवीन घर मिळवून दिलं आहे. हिरालाल यांचा 30 वर्षांचा मुलगा सुनील याचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता.
सुनीलच्या मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळा पसरली होती. तरुण मुलाच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबाची अवस्था बिकट झाली असून याचा सर्वाधिक फटका सुनीलची पत्नी सीमा यांना बसला होता. एके दिवशी सीमा यांच्या सासरच्यांनी सुनेला विचारले की तुला पुन्हा लग्न करायचं आहे का? सुरुवातीला सीमाने नकार दिला. नंतर घरच्यांच्या सांगण्यावरून ती दुसऱ्या लग्नासाठी तयार झाली.
सासरच्या लोकांनी मुलगा शोधायला सुरुवात केली आणि लवकरच त्यांना बडवानीमध्ये त्यांची सून सीमासाठी योग्य मुलगा सापडला. तलवाडा येथे राहणाऱ्या नैमीचंदसोबत सीमाचे लग्न ठरले. लग्नाची तारीख ठरली आणि सासू-सासऱ्यांनी सुनेचं कन्यादान करायचं ठरवलं. हिरालाल यांनी आपली सून सीमा हिचा विवाह उज्जैनच्या चिंतामण गणपती मंदिरात केला. अनेक जण उपस्थित होते.
सीमाचे वडील कैलाश, आई गीताबाई आणि भाऊ शुभम हे देखील सीमाच्या दुसऱ्या लग्नामुळे खूश आहेत. असे नातेवाईक मिळाल्याने आपण धन्य झालो असे ते सांगतात. समाजातील इतर लोकांनीही हिरालाल यांच्या निर्णयाचं कौतुक केले. यावेळी टांडाखेडाचे सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल टांक म्हणाले की, काळानुरूप सामाजिक चालीरीती, प्रथा बदलणे गरजेचे आहे. या धाडसी कृतीतून समाजात नवी परंपरा प्रस्थापित केली जाईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"