करमबीर सिंग यांनी नौदल प्रमुखपदाची सूत्रे शुक्रवारी हाती घ्यावीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 03:46 AM2019-05-30T03:46:07+5:302019-05-30T03:46:31+5:30

नौदलाचे नवे प्रमुख म्हणून व्हॉईस अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांना शुक्रवारी सूत्रे हाती घेण्यास लष्करी लवादाने बुधवारी संमती दिली.

Karambir Singh should take over as the Chief of Naval Staff on Friday | करमबीर सिंग यांनी नौदल प्रमुखपदाची सूत्रे शुक्रवारी हाती घ्यावीत

करमबीर सिंग यांनी नौदल प्रमुखपदाची सूत्रे शुक्रवारी हाती घ्यावीत

Next

नवी दिल्ली : नौदलाचे नवे प्रमुख म्हणून व्हॉईस अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांना शुक्रवारी सूत्रे हाती घेण्यास लष्करी लवादाने बुधवारी संमती दिली. करमबीर सिंग यांच्या नवे नौदल प्रमुख पदावरील नियुक्तीला अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ व्हॉईस अ‍ॅडमिरल बिमल वर्मा यांनी सशस्त्र दलांच्या येथील लवादाकडे याचिकेद्वारे आव्हान दिलेले आहे. करमबीर सिंग यांची नियुक्ती माझ्या ज्येष्ठत्वाला टाळून करण्यात आली आहे, असे वर्मा यांचे म्हणणे आहे. सिंग यांच्या नियुक्तीशी संबंधित आणखी माहिती लवादासमोर ठेवण्यासाठी सरकारने आणखी वेळ मागवून घेतला असल्यामुळे वर्मा यांच्या याचिकेवर लवाद १७ जुलै रोजी सुनावणी घेणार आहे, असे वर्मा यांचे वकील अंकूर छिब्बर यांनी सांगितले.
सध्याचे नौदल प्रमुख सुनील लानबा यांच्याकडून नव्या नौदल प्रमुखपदाची सूत्रे करमबीर सिंग यांनी ३१ मे रोजी घ्यावीत आणि याचिकेवरील अंतिम निकालावर सिंग हे पुढे त्या पदावर असतील की नाही हे अवलंबून असेल, असे लवादाने म्हटले. वर्मा हे अति-वरिष्ठ नौदल कमांडर आहेत. नव्या नौदल प्रमुखांच्या निवडीशी संबंधित सर्व प्रकारचे दप्तर आणि दस्तावेज २९ मे रोजी आमच्यासमोर सादर करावा, असे लवादाने सरकारला २२ मे रोजी सांगितले होते; परंतु सरकार तसे करू शकले नाही. या महिन्याच्या प्रारंभी संरक्षण मंत्रालयाने वर्मा यांची याचिका फेटाळल्याचा आदेश काढला होता. यानंतर वर्मा यांनी सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी, याचिका लवादाकडे केली होती.

Web Title: Karambir Singh should take over as the Chief of Naval Staff on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.