करणी सेनेची सरकारला उघड धमकी! पद्मावती प्रदर्शित झाल्यास परिणाम भोगायला तयार रहा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 08:38 AM2018-01-06T08:38:36+5:302018-01-06T08:44:26+5:30
पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनासंबंधी सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये ठरलेला तडजोडीचा फॉर्म्युला करणी सेनेने फेटाळून लावला आहे. करणी सेनेने सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला इशारा दिला आहे.
नवी दिल्ली - पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनासंबंधी सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये ठरलेला तडजोडीचा फॉर्म्युला करणी सेनेने फेटाळून लावला आहे. चित्रपटावर बंदी घालण्याच्या आपल्या मागणीवर करणी सेना ठाम आहे. करणी सेनेने सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला इशारा दिला आहे. पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीच करणी सेनेने दिली आहे.
सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार चित्रपटात काही बदल करण्यात येणार आहेत पण करणी सेनेला हे बदल मान्य नाहीत. या चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जे काही होईल त्याला भाजपा सरकार आणि सेन्सॉर बोर्ड जबाबदार असेल अशी उघड धमकी करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांनी दिली आहे.
चित्रपट सुरु होण्याआधी एक डिस्केलमर दिसेल. त्यावर चित्रपट काल्पनिक असल्याचा संदेश असेल. संजय लीला भन्साळींचा चित्रपट जसा काल्पनिक आहे तसेच आम्ही चित्रपटगृहात जेव्हा फुले उधळू ते सुद्धा काल्पनिकच असेल असे सुखदेव सिंह गोगामेडी म्हणाले.
काय आहेत बदल
केंद्रीय चित्रपट प्रमाणन बोर्डाने (सीबीएफसी) संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटास यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करावे यासह एकूण पाच सुधारणा बोर्डाने सुचविल्या आहेत. हे बदल भन्साळी यांनी मान्य केले आहेत.
सीबीएफसीने दिलेल्या निवेदनात म्हटले की, २८ डिसेंबर रोजी बोर्डाच्या परीक्षण समितीची बैठक झाली. चित्रपटात काही बदल सुचवून यूए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आपला चित्रपट मलिक मुहंमद जायसी याच्या पद्मावत या काव्यावर आधारित असल्याचे भन्साळी यांनी संसदीय समितीसमोर सांगितले होते.
राजपूत समुदायाच्या आक्षेपानंतर भन्साळी यांचा १५० कोटींचा हा चित्रपट वादात सापडला होता. चित्रपटाविरुद्ध उग्र निदर्शने करण्यात आली होती. सूचवलेले बदल चित्रपटाचे नाव ‘पद्मावत’ करा. ‘हा चित्रपट सती प्रथेचे उदात्तीकरण करीत नाही,’ अशी सूचना चित्रपटाच्या दाखवा.‘घुमर’ या गाण्यात बदल करा. ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भांमध्ये योग्य बदल करा. चित्रपटाचा ऐतिहासिक घडामोडींची पूर्णपणे संबंध नाही, अशी सूचना चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवा असे सांगण्यात आले आहे.