चिमुकल्याला आगीतून वाचवण्यासाठी कुशीत घेऊन धावला; शूरवीराचा फोटो पाहून तुम्हीही कराल 'कडक सॅल्युट'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 03:50 PM2022-04-04T15:50:02+5:302022-04-04T15:51:15+5:30
नुकतीच एक अशी घटना समोर आली आहे जी वाचून तुम्हीही त्या पोलिसाला नक्कीच कडक सॅल्युट कराल.
जनतेच्या संरक्षणासाठी पोलीस सदैव तत्पर असतात. नुकतीच एक अशी घटना समोर आली आहे जी वाचून तुम्हीही त्या पोलिसाला नक्कीच कडक सॅल्युट कराल. राजस्थानमध्ये (Rajasthan) नवसंवत्सर निमित्त काढण्यात आलेल्या बाईक रॅलीवर (Bike Rally) झालेल्या दगडफेकीनंतर जाळपोळीचे प्रकार घडले. शनिवारी या घटनेचे काही फोटो सोशल मीडियावर (Social Media) वर व्हायरल झाले. यातच एक असा फोटोही समोर आला जो पाहून लोकांनी पोलिसांच्या शूरपणाचं कौतुक केलं.
दरम्यान, व्हायरल झालेल्या फोटोंपैकी हा फोटो राजस्थान पोलिसातील हवालदार नेत्रेश शर्मा यांचा आहे. फोटोमध्ये हवालदार नेत्रेश एका चिमुकल्याला आगीमधून वाचवून आपल्या कुशीत घेऊन सुरक्षित स्थळी नेताना दिसत आहेत. बाजारात खरेदीसाठी आलेल्या दोन महिला हिंसाचारानंतर झालेल्या जाळपोळीपासून बचाव करण्यासाठी जवळच्या घरात लपल्या. त्यावेळी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाल्याचं सांगण्यात येत आहे.
घरही चारही बाजूंनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यावर त्यांच्यासोबत असलेल्या महिला आणि लहान मूल रडायला लागले. मुलाचा आवाज ऐकून हवालदार नेत्रेश धावत आले आणि मुलाला आपल्या कुशीत घेऊन बाहेरच्या दिशेने धावले. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलाही त्यांच्या मागे धावल्या. यामुळे तिघांचेही प्राण बचावले.
राजस्थान पोलिसांकडूनही कौतुक
राजस्थान पोलिसांनीही ट्वीट करून आपल्या कॉन्स्टेबलच्या धैर्याला सलाम केला आहे. राजस्थान पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांचा फोटोही शेअर केला आहे. करौली येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं.
एक मां को साथ लिए, सीने से मासूम को चिपकाए दौड़ते खाकी के कदम।#RajasthanPolice के कांस्टेबल नेत्रेश शर्मा के जज्बे को सलाम।
— Rajasthan Police (@PoliceRajasthan) April 3, 2022
करौली उपद्रव के बीच आमजन की सुरक्षा पुख्ता करने में जुटी पुलिस। @RajCMO@DIPRRajasthan@KarauliPolicepic.twitter.com/XtYcYWgZWs
नेत्रेश यांनी सांगितला संपूर्ण प्रकार
"मी सिग्मा गाडीवर तैनात होतो. बाईक रॅली सकाळी साडेतीन वाजता रवाना झाली. ५ वाजता ती हटवाड्यात पोहोचली. मी २०० मीटर पुढे गणेश गेटवर होतो. हिंसाचाराची माहिती मिळताच मी घटनास्थळी पोहोचलो. त्या ठिकाणी आगही लागली होती. याचदरम्यान, त्या ठिकाणी आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेलं घर पाहिलं. महिलांच्या रडण्याचाही आवाज येत होता आणि एका महिलेच्या कडेवर चार वर्षांचं बाळही होतं," असं नेत्रेश म्हणाले.
भीषण परिस्थितीत पाहता मी त्वरित निर्णय घेतला आणि सिग्मा गाडीतून उतरून धावत आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेल्या घराकडे गेलो. त्या महिलांच्या चेहऱ्यावर जी भीती होती ती कधीही विसरता येणार नसल्याचंही ते म्हणाले.