Kargil Vijay Diwas : ...तरीही 'या' जवानाने पाकच्या ४८ सैनिकांना ठार करत फडकवला होता तिरंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 02:25 PM2020-07-26T14:25:49+5:302020-07-26T14:27:39+5:30
१९९९ मध्ये झालेल्या या युद्धात भारतीय जवानांनी पराक्रमांची शर्थ करत पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांना हुसकावून लावत विजय मिळवला होता.
नवी दिल्ली : कारगिलच्या रणभूमीवर लढल्या गेलेल्या युद्धाला आज २१ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने देशभरात शहीद जवानांना मानवंदना देण्यात येत आहे. तसेच, यानिमित्ताने देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१९९९ मध्ये झालेल्या या युद्धात भारतीय जवानांनी पराक्रमांची शर्थ करत पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांना हुसकावून लावत विजय मिळवला होता. जम्मू-काश्मीरमधील कारगिल, द्रास आणि बटालिक या विभागात लढल्या गेलेल्या या युद्धात भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय मोहीम राबून शत्रूला सळो की पळो करून सोडले होते.
या युद्धात भारताकडून अजेक जवानांनी पराक्रमांची शर्थ केली. त्यांच्यापैकी एक म्हणजे निवृत्त जवान दिगेंद्र सिंह. राजस्थानमधील सीकर येथील रहिवासी असलेल्या दिगेंद्र सिंह यांनी कारगिलच्या युद्धाता पाकिस्तानशी लढताना अतुल्य पराक्रम गाजवला होता. युद्धादरम्यान दिगेंद्र सिंह यांना पाच गोळ्या लागल्या. अशा परिस्थितीतही जिद्दीने लढा देत त्यांनी पाकिस्तानच्या ४८ सैनिक आणि घुसखोरांना ठार मारले होते.
दिगेंद्र सिंह हे लष्करातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या 2 राजपुताना रायफल्सकडून लढले होते. कारगिल युद्धादरम्यान दिगेंद्र सिंह यांनी पाकिस्तानचा मेजर अन्वयाचे शीर धडापासून वेगळे करून त्यावर तिरंगा फडकवला होता. दरम्यान, कारगिल युद्धाच्या समाप्तीनंतर दिगेंद्र सिंह यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते. दिगेंद्र सिंह हे 2005 साली लष्करातून निवृत्त झाले होते.