"तेव्हा मोदी 105 वर्षांचा असेल, आज शिव्या का खाईल?" अग्निपथ योजनेवरून पंतप्रधानांनी विरोधकांना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 12:49 PM2024-07-26T12:49:16+5:302024-07-26T12:50:21+5:30
"...मोदी असा राजकारणी आहे का जो आज शिव्या खाईल? काय तर्क देत आहेत."
कारगिल विजय दिनानिमित्ताने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज द्रासला भेट दिली. यावेळी त्यांनी अग्निपथ योजनेवरही मोकळेपणाने भाष्य केले. ते म्हणाले, "या योजनेच्या बाबतीत काही लोकांनी देशातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. याच वेळी त्यांनी विरोधीपक्षांवर हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून देशाच्या लष्कराला कमकुवत करण्याचा आरोपही केला. ते म्हणाले, अग्निपथ योजनेचे उद्देश देशाचे लष्कर तरुण करणे आहे.
पेन्शनच्या नावाने निर्माण केला संभ्रम -
अग्निपथ योजनेसंदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "प्रायव्हेट सेक्टर आणि पॅरामिलिट्री फोर्सेसमध्ये अग्निवीरांना प्राधान्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मला आश्चर्य वाटते की, काही लोकांच्या विचारांना काय झाले आहे? सरकारने पेन्शनचे पैसे वाचवण्यासाठी ही योजना आणली असल्याचा संभ्रम ते निर्माण करत आहेत.
तेव्हा तर मोदी 105 वर्षांचा असेल -
मोदी म्हणाले, "अशा लोकांच्या विचारांची मला किळस वाटते. मात्र अशा लोकांना मला विचारायचे आहे की, मोदीच्या सत्ताकाळात ज्यांची भरती होणार आहे, त्यांना आजच पेन्शन द्यायची आहे का? त्यांना 30 वर्षांनंतर पेन्शन द्यावी लागणार आहे. तेव्हा तर मोदी 105 वर्षांचा असेल. जेव्हा मोदी 105 वर्षांचा असेल, 30 वर्षांनंतर जी पेन्शन वाचेल, तर मोदी असा राजकारणी आहे का जो आज शिव्या खाईल? काय तर्क देत आहेत."
मोदी म्हणाले, "ज्याप्रमाणे मी यापूर्वी म्हटले आहे, आम्ही राजकारणासाठी नाही, तर राष्ट्रकारणासाठी काम करत आहोत. आमच्यासाठी देशाची सुरक्षितता सर्वोपरी आहे. आमच्यासाठी 140 कोटी लोकांची शांतता सर्वप्रथम आहे. जे लोक देशातील तरुणांची दिशाभूल करत आहेत, इतिहास साक्षी आहे, त्यांना सैनिकांची कसलीही परवा नाही. हे तोच लोक आहे, जे 500 कोटी रुपयांची नाममात्र रक्कम दाखवून वन रँक वन पेन्शनवर खोटे बोलत होते. मात्र, आमच्या सरकारने वन रँक वन पेन्शन लागू केली आहे.