धावत्या कारवर अचानक कोसळला ७० किलोचा दगड; चालक म्हणतो, आकाशातून पडला; पोलीस चकित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 01:55 PM2021-11-17T13:55:26+5:302021-11-17T13:55:38+5:30
पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू; चालकाचा दावा ऐकून पोलीस चक्रावले
कर्नाल: हरयाणातील कर्नालमध्ये एका कारवर ७० किलोचा दगड पडला. दिल्ली-चंदिगढ राष्ट्रीय महामार्गावरून जात असलेल्या एका स्कॉर्पिओ कारवर अचानक दगड पडला. त्यानंतर तिथे मोठी गर्दी जमली. पोलिसदेखील घटनास्थळी पोहोचले. दगड नेमका पडला कुठून असा पोलिसांना पडला. कारवर कोसळलेला दगड आकाशातून पडल्याचा दावा चालकानं केला. त्यामुळेच कार आधीच रोखली. या कारणामुळेच कारच्या पुढील भागाचं नुकसान झालं, असंही चालकानं सांगितलं.
२५ ते ३० फूट उंचीवरून दगड कोसळत असताना दिसल्याचा दावा चालकानं केला. दगड कारच्या दिशेनं येत असल्याचं पाहून लगेच ब्रेक दिला. त्यामुळे दगड कारच्या मध्यभागी पडण्याऐवजी पुढील भागावर कोसळला. यात कारचं मोठं नुकसान झालं, असं चालकानं सांगितलं. कारमध्ये चालकासोबत आणखी चार महिला होत्या. सुदैवानं त्यांना कोणतीही इजा झाली नाही.
चालकानं घटनेची माहिती पोलिसांना दिली. आकाशातून कारवर दगड कोसळल्याचं चालकानं पोलिसांना सांगितलं. मात्र त्यांचा यावर विश्वास बसेना. कार चालक दगड घेऊन घरोंडा पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यानं या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. सध्या पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
मंगळवारी दुपारी कोहड गावचे माजी सरपंच सुभाष शर्मा पानीपतला एका लग्न समारंभासाठी जात होते. कारमध्ये त्यांच्या कुटुंबातील ४ महिला होत्या. सुभाष शर्मा यांची कार उड्डाणपुलावरून उतरून घरोंडा बस स्थानकासमोर पोहोचताच एक मोठा दगड त्यांच्या कारच्या पुढील भागावर पडला. दगड जवळपास २५ ते ३० फूट उंचीवर असतानाच आपल्याला तो दिसला होता, असा दावा सुभाष यांनी केला. दगड पाहताच सुभाष यांनी ब्रेक दाबला. त्यानंतर दगड त्यांच्या कारच्या पुढील भागावर कोसळला.