‘कर्णन माफी मागू इच्छितात...’
By admin | Published: May 13, 2017 12:05 AM2017-05-13T00:05:48+5:302017-05-13T00:05:48+5:30
कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. एस. कर्णन बिनशर्त माफी मागू इच्छितात; परंतु न्यायालय रजिस्ट्री त्यांचा अर्ज स्वीकारत नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. एस. कर्णन बिनशर्त माफी मागू इच्छितात; परंतु न्यायालय रजिस्ट्री त्यांचा अर्ज स्वीकारत नाही, असे कर्णन यांच्या वकिलाने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले. कर्णन यांच्या अटकेच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी विनंतीही त्यांच्या वकिलाने केली. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती कर्णन यांना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ते अर्ज करू शकतात आणि न्यायाधीश उपलब्ध असताना त्यावर सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय पीठाने ९ मे रोजी कर्णन यांना कारावास ठोठावून कोलकाता पोलिसांना त्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना कारावास ठोठावले गेलेले ते पहिले न्यायमूर्ती ठरले. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा ठोठावण्यापूर्वी कर्णन कोलकात्याबाहेर पडले. ते चेन्नईत राहत असल्याचे वृत्त आहे.
कर्णन यांच्याविरुद्ध विवेकपूर्ण निर्णय-
न्यायमूर्ती सी. एस. कर्णन यांच्याविरुद्ध विवेकपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी म्हटले. सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले की, सातही न्यायमूर्ती एक विवेकपूर्ण निर्णय घेण्यासाठी एकत्र आले. तीन तलाकच्या मुद्यावर सुनावणी घेत असलेल्या इतर चार न्यायमूर्तींसोबत स्थानापन्न असताना खेहर यांनी ही टिपणी केली.