‘अर्जुन’ व्हा अन् भविष्य लक्षात घेत मतदान करा; प्रियांका गांधींचे जनतेला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 09:38 AM2023-05-05T09:38:42+5:302023-05-05T09:39:36+5:30
प्रियांका गांधी म्हणाल्या की, इंदिरा गांधींचे सरकार जमीन सुधारणांसाठी प्रसिद्ध झाले. राजीव गांधी यांचे सरकार माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला पुढे नेण्यासाठी प्रसिद्ध झाले.
कनकगिरी (कर्नाटक) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे नेते केवळ नको ते मुद्दे उकरून काढत आहेत, मात्र ते ‘४० टक्के कमिशन’ घेणाऱ्या सरकारवर आणि जनतेच्या कामाबद्दल बोलत नाहीत. त्यामुळे जनतेने कर्नाटकचे ‘अर्जुन’ होत केवळ आपले भवितव्य लक्षात घेऊन मतदान करावे, असे आवाहन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गुरुवारी केले आहे. त्या कोप्पल जिल्ह्यातील कनकगिरी भागात एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना बोलत होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अन्य वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला.
प्रियांका गांधी म्हणाल्या की, इंदिरा गांधींचे सरकार जमीन सुधारणांसाठी प्रसिद्ध झाले. राजीव गांधी यांचे सरकार माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला पुढे नेण्यासाठी प्रसिद्ध झाले. आज काही राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे आहेत, तिथेही त्यांची वेगळी ओळख आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छत्तीसगडमध्ये आमच्या सरकारची ओळख निर्माण झाली आहे. कर्नाटकातील भाजप सरकार ४० टक्के कमिशन सरकारच्या नावावर चालते ही खेदाची आणि शरमेची बाब नाही का?, असे त्या म्हणाल्या.
जनतेच्या प्रश्नावर बोला
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपचे इतर मोठे नेते जनतेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. कधी ते धर्माबद्दल बोलतात, मात्र तुमच्या विकासाच्या कामाबद्दल बोलले जात नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे लक्ष विचलित न करता भविष्य लक्षात घेत मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.
कमिशनचे सरकार हे ठेकेदारांनी नाव दिले
इतर कोणत्याही पक्षाने भाजप सरकारला ४० टक्के कमिशनचे सरकार हे नाव दिले नाही. ते ठेकेदारांनी दिले आहे. त्यांना ४० टक्के कमिशन द्यावे लागते. इतर अनेक भरतीत अनियमितता झाली आहे. या सरकारमध्ये प्रत्येक पदाचे रेट ठरलेले असल्याचा आरोप
त्यांनी केला.