Video:हिजाब काढा, मगच शाळेत या; कोर्टाच्या सूचनेचं शिक्षिकेनं पालन केलं, पालकांनाही समजावलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 05:43 PM2022-02-14T17:43:34+5:302022-02-14T18:12:17+5:30
कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात हिजाब घातलेल्या विद्यार्थिनीला शाळेच्या गेटवर अडवल्याचे दिसत आहे.
मंड्या: कर्नाटकात सुरू झालेला हिजाब वाद अजून शांत झालेला नाही. या हिजाब वादामुळे न्यायालयानेशाळा-कॉलेज बंद केले होते, पण गेल्या आठवड्यात धार्मिक कपडे न घालण्याच्या अटीवर शाळा-कॉलेज सुरू करण्यास परवानगी दिली. पण, परत एकदा कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातून हिजाबचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.
जिल्ह्यातील सरकारी शाळेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीला हिजाब घातल्यामुळे शाळेत प्रवेश नाकारला. आज(सोमवार)पासून राज्यातील शाळा सुरू झाल्या. विद्यार्थी शाळेत येत आहेत. पण, मंड्या जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत विद्यार्थिनीला हिजाब घातला म्हणून प्रवेश नाकारला. हिजाब काढल्यानंतरच तिला शाळेत प्रवेश देण्यात आला. एएनआय या वृत्तसंस्थेने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
#WATCH | K'taka: Argument b/w parents & a teacher outside Rotary School in Mandya as she asked students to take off hijab before entering campus
— ANI (@ANI) February 14, 2022
A parent says,"Requesting to allow students in classroom, hijab can be taken off after that but they're not allowing entry with hijab" pic.twitter.com/0VS57tpAw0
गेल्या आठवड्यातच उच्च न्यायालयाने अंतरिम आदेशात म्हटले होते की, शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू होऊ शकतात, परंतु धर्माशी संबंधित कपड्यांना शाळेच्या आवारात परवानगी दिली जाणार नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, महिला (कदाचित शिक्षिका) हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनीला शाळेच्या गेटवर थांबवते आणि हिजाब काढण्यास सांगते. व्हिडिओमध्ये, मुलीचे पालक शाळेत प्रवेश करण्यास मनाई केल्याने वाद घालताना दिसत आहेत. बराच वेळ वाद झाल्यानंतर मुलीला हिजाब काढूनच शाळेच्या आवारात प्रवेश दिला जातो.
धार्मिक कपड्यांना शाळेत बंदी
हिजाबच्या वादानंतर बंद झालेल्या 10वीपर्यंतच्या शाळा आज पुन्हा सुरू झाल्या आहेत. अकरावी आणि बारावीच्या शाळा बुधवारपर्यंत बंद आहेत. हिजाब प्रकरणी हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. शांतता आणि सलोखा राखण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने गेल्या आठवड्यात बंद केलेल्या शाळा आणि महाविद्यालये उघडण्याचे आदेश दिले. पण, हिजाबसह कोणतेही धार्मिक कपडे परिधान करुन शाळेत येण्यावर बंदी घातली आहे.