कर्नाटकात सर्व विद्यार्थ्यांना कन्नड भाषा शिकणे सक्तीचे
By Admin | Published: April 1, 2015 11:23 PM2015-04-01T23:23:03+5:302015-04-01T23:23:03+5:30
कर्नाटकच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना कन्नड भाषा शिकण्याची सक्ती करणाऱ्या कायद्याच्या विधेयकास राज्य विधानसभेने मंगळवारी मंजुरी दिली.
बंगळुरू : कर्नाटकच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना कन्नड भाषा शिकण्याची सक्ती करणाऱ्या कायद्याच्या विधेयकास राज्य विधानसभेने मंगळवारी मंजुरी दिली.
राज्यातील सर्व शाळांनी २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून एक सक्तीचा भाषा विषय म्हणून कन्नडचे शिक्षण टप्प्याटप्प्याने द्यायला हवे, असा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने याआधीच घेतला होता. हे विधेयक त्याच धोरणाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी आहे, असे शालेय शिक्षणमंत्री किम्मने रत्नाकर यांनी विधानसभेत विधेयक मांडताना सांगितले.
केरळसारख्या दक्षिणेकडील इतर राज्यांतही शाळांमध्ये स्थानिक भाषेचे शिक्षण देणे सक्तीचे करण्यात आले आहे, याकडेही मंत्र्यांनी लक्ष वेधले.
या नव्या कायद्यानुसार कर्नाटकमधील सर्व शाळांना प्रथम अथवा द्वितीय भाषा म्हणून सर्व विद्यार्थ्यांना कन्नड भाषेचे शिक्षण द्यावे लागेल.
सध्या ज्या शाळांमध्ये पहिली किंवा दुसरी भाषा म्हणून कन्नड हा विषय शिकविला जात नाही, त्यांना २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून हा विषय पहिल्या इयत्तेच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत करून पुढे तो टप्प्याटप्प्याने इयत्ता दहावीपर्यंत वाढवत न्यावा लागेल. (वृत्तसंस्था)