कर्नाटक विधानसभेत गोहत्या बंदीचे विधेयक मंजूर
By मोरेश्वर येरम | Published: December 9, 2020 07:57 PM2020-12-09T19:57:53+5:302020-12-09T19:58:52+5:30
कर्नाटकात आता गोहत्येवर पूर्णपणे बंदी असणार का? यावर बोलताना कर्नाटकचे कायदे, संसदीय कार्य व कायदेमंत्री जे.सी. मधुस्वामी यांनी वेगळंच उत्तर दिलं आहे.
कर्नाटक विधानसभेत आज गोहत्या बंदीच्या कायद्याला मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारने गोहत्या बंदीचे विधेयक विधानसभेत मांडले होते. अखेर आज हे विधेयक मंजूर झाले आहे.
कर्नाटकात आता गोहत्येवर पूर्णपणे बंदी असणार का? यावर बोलताना कर्नाटकचे कायदे, संसदीय कार्य व कायदेमंत्री जे.सी. मधुस्वामी यांनी वेगळंच उत्तर दिलं आहे. "कर्नाटकात १३ वर्षांवरील गोहत्येला परवानगी आहे", असं ते म्हणाले आहेत. याआधी पशुसंवर्धन मंत्री प्रभू चौहान यांनी 'द क्विंट'ला दिलेल्या माहितीत नव्या विधेयकानुसार सर्व प्रकारच्या गोवंशाच्या मांसाला यापुढे 'गोमांस' म्हणून संबोधले जाईल, असं म्हटलं होतं.
विधेयकाची प्रत मिळालेली नाही- सिद्धरामय्या
गोहत्या बंदीचे विधेयक कोणत्याही चर्चेविना पटलावर आणल्याचं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते सिद्धरामय्या यांनी म्हटलं होतं. "विधानसभेत आज पशुसंवर्धन मंत्री यांनी प्राणी कत्तल प्रतिबंध आणि संरक्षण विधेयक सादर करत असल्याचं जाहीर केलं आणि आम्ही आश्चर्यचकीत झालो. कारण या विधेयकाबाबत कोणतीच चर्चा झाली नाही", असं सिद्धरामय्या म्हणाले.
दरम्यान, या विधेयकाची प्रत अद्याप मला मिळालेली नाही, असंही ते पुढे म्हणाले. "कोणतंही विधेयक विधीमंडळाच्या पटलावर मांडण्याआधी त्याची प्रत सर्वांना देण्यात येते. पण खुद्द पशुसंवर्धन मंत्र्यांकडेही या विधेयकाची प्रत हातात नव्हती.", असं सिद्धरामय्या म्हणाले.