Karnataka Assembly Election 2018; शिकारपूरीमधून बी.एस. येडीयुरप्पा पुन्हा एकदा विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 04:03 PM2018-05-15T16:03:23+5:302018-05-15T16:03:23+5:30
शिकारीपुरा मतदारसंघातून भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी. एस येडीयुरप्पा अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत.
बेंगळुरु- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार बी.एस. येडीयुरप्पा त्यांच्या पारंपरिक मतदारसंघ शिकारीपुरामधून पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. येडीयुरप्पा यांनी 1983, 1985, 1989, 1994, 2004, 2008, 2013 अशा अनेक निवडणुका येथून विजयी झाले आहेत. 1999मध्ये त्यांचा या मतदारसंघात पराभव झाला होता. काँग्रेसच्या महालिंगाप्पा यांनी येडीयुरप्पांचा पराभव केला होता. येडीयुरप्पा यांनी 2013 साली कर्नाटक जनता पार्टीकडून निवडणूक लढविली होती. 2014मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांचे पुत्र बी. वाय राघवेंद्र विजयी झाले. मावळत्या विधानसभेत राघवेंद्र यांनीच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
येडियुरप्पांचा जन्म २७ फेब्रुवारी १९४३चा. मंड्या जिल्ह्यातील के.आर.पेट तालुक्यातील बुकनकेरे गावी ते जन्माला आले. संत सिद्दालिंगेश्वरा यांनी तुमकुरमध्ये येडियूर मंदिराची स्थापना केली होती. त्या मंदिराच्या नावातून त्यांचे नाव ठेवण्यात आले. कोठेतरी श्रद्धाळू लिंगायत समाजाशी जन्मापासूनच नाते जुळण्यास सुरुवात झाली असावी ती अशी. घरची परिस्थिती तशी बऱ्यापैकी. मंड्या महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर १९६५मध्ये समाज कल्याण खात्यात प्रथम श्रेणी कारकून म्हणून ते रुजू झाले. पण सरकारी नोकरीत मन काही रमले नसावे. ती सोडून ते विरभद्र शास्त्रींच्या शिकारीपुरा येथील शंकर राइस मिलमध्ये कारकून झाले. १९६७मध्ये मिलच्या मालकाची कन्या मिथ्रादेवीशी त्यांचे लग्न झाले. आधीपासूनच याच परिसरात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही जाळे विणले. १९७०मध्ये ते संघाचे नगर कार्यवाह झाले. दरम्यान जनसंघाच्या माध्यमातून त्यांचा याच परिसरात राजकारण प्रवेश झाला. पुढे भाजपापर्यंतचा प्रवासही. तसाच नगरसेवक पदापासून आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्ष, विरोधीपक्ष नेते, मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदापर्यंतचं सत्तेच राजकारणही रंगले.
शिकारीपुराने येडियुरप्पांना चांगलीच साथ दिली. सातत्याने ते तेथून आमदार म्हणून निवडून आले. अगदी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बंगारप्पा हे काँग्रेस, जनता दलाच्या संयुक्त पाठिंब्याने समाजवादी पार्टीतर्फे लढले तेव्हा येडियुरप्पांनी त्यांना दणक्यात हरवले. अपवाद १९९९चा. पहल्यांदाच ते पराभूत झाले. मात्र पक्षाला या जनाधार असलेल्या नेत्याची किंमत माहित असल्याने त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात आले. पुढील निवडणुकीत त्यांनी दमदार पुनरागमन केले. २००४मध्ये विरोधीपक्षनेते झाले. मधल्याकाळात ४० महिन्यासाठी ठरलेल्या भाजपा- जनता दल तडजोड सरकारमध्ये कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले तेव्हा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले. मात्र २० महिन्यांनंतर कुमारस्वामींना पदाचा मोह सोडवेना आणि त्यांनी पद सोडण्यास नकार दिला. येडियुरप्पांचे मुख्यमंत्रीपद हुकले. काही दिवसांनी जनता दलाला उपरती झाली. येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले. मात्र अवघ्या आठवड्यासाठीच. खातेवाटपावरून वाद घालत जनता दलाने सरकार पाडले. निवडणुका झाल्या. येडियुरप्पांनी झंझावाती प्रचार केला. ३० मे २००८ रोजी येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांचा बेधडक कारभार अंगाशी आला. आरोप झाले. बेकायदा खाण प्रकरण लोकायुक्तांकडे गेले. त्यांनी बंगळुरु, शिवमोग्गा जमीन व्यवहारात येडियुरप्पांवर ठपका ठेवला. प्रचंड गदारोळ झाला. दिल्लीपर्यंत राजकारण झाले. अखेर ३१ जुलै २०११ रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला. सदानंद गौडा मुख्यमंत्री झाले. तेथून ते मनाने भाजपापासून दुरावले. त्यांनी ३० नोव्हेंबर २०१२ भाजपाला सोडचिठ्ठी कर्नाटक जनता पार्टीची वेगळी वाट निवडली. पण त्यांना आणि भाजपालाही फटका बसला. काँग्रेस सत्तेत आली. सिद्धारामय्या मुख्यमंत्री झाले. 2014 साली येडीयुरप्पा लोकसभेत निवडून गेले. भाजपाने त्यांना पुन्हा एकदा पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. कदाचित त्याचाच फायदा आता या निवडणुकीत भाजपाला दिसत आहे.
दरम्यानच्या काळात भाजपातही बदल सुरु झाले. नरेंद्र मोदींचे वारे वाहू लागले. २ जानेवारी २०१४ येडियुरप्पा स्वगृही परतले. कोणत्याही अटींविना. २०१४ मध्ये त्यांना तसेच त्यांच्या घनिष्ठ समर्थक शोभा करंदलाजे यांना उडुपी-चिकमगळूर मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. ते निवडूनही आले. २०१६मध्ये भाजपाने त्यांना प्रदेशाध्यक्षपद बहाल केले. परंपरा मोडत २०१८च्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणूनही जाहीर केले.