Karnataka Assembly Election: कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर, अनेकांचे तिकीट कापले, धक्कादायक निर्णय घेतले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 11:04 PM2023-04-11T23:04:59+5:302023-04-11T23:07:00+5:30
Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये भाजपाने एकूण १८९ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये भाजपाने एकूण १८९ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड करताना भाजपाच्या पक्षनेतृत्वाने भरपूर विचारविमर्ष आणि अनेक बदल करून अखेर आज आपली पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भाजपाकडून नव्या पिढीला संधी देण्यात आली आहे. अनेक जागांवर राजकीय डावपेच खेळताना मोठे बदल करण्यात आले आहेत.
भाजपाने आपल्या उमेदवावारांच्या पहिल्या यादीमध्ये ८ महिला, ३२ ओबीसी, ३० एससी, १६ एसटी, ५ वकील आणि ९ डॉक्टरांना उमेदवारी दिली आहे. यावेळी कर्नाटकमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तसेच बदनाम नेत्यांपासून अंतर ठेवण्यात यावे. तसेच घराणेशाहीलाही फार प्रोत्साहन देता कामा नये, असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरला होता. या सल्ल्यांनुसारच उमेदवारंची यादी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपाने जी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पुन्हा एकदा शिगगांव येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर आर. अशोक यांना कनकपूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. ते कर्नाटक काँग्रेसमधील दिग्गज नेते डी.के. शिवकुमार यांना आव्हान देतील. चन्नापटना येथे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्याविरोधात सी. पी. योगेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपाने अनेक विद्यमान आमदारांची तिकिटं कापली आहेत. तसेच माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनाही अथनी येथून उमेदवारी देण्यात आलेली नाही.
दरम्यान, कर्नाटकमध्ये १३ एप्रिलपासून नामांकन प्रक्रिया सुरू होणार आहे. २० एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १० मे रोजी मतदान तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.