Karnataka Assembly Election: माजी मुख्यमंत्री शेट्टरही बंडखोरीच्या पवित्र्यात, सवदींना काँग्रेसची उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 07:29 AM2023-04-16T07:29:59+5:302023-04-16T07:30:35+5:30
Karnataka Assembly Election 2023: काँग्रेसने कर्नाटक विधानसभेसाठी ४३ उमेदवारांची तिसरी यादी शनिवारी जाहीर केली. यामध्ये भाजपमधून आलेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी अथणी मतदार संघातून पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे.
बंगळुरू : काँग्रेसने कर्नाटक विधानसभेसाठी ४३ उमेदवारांची तिसरी यादी शनिवारी जाहीर केली. यामध्ये भाजपमधून आलेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी अथणी मतदार संघातून पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे आता २२४ पैकी केवळ १५ उमेदवार जाहीर व्हायचे आहेत.
भाजपमधील असंतुष्टांची संख्या वाढतच असून, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनीही पक्षाविरोधात दंड थोपटले आहेत. उद्या, रविवारपर्यंत उमेदवारी न मिळाल्यास पुढील निर्णय घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.
काँग्रेसने माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना वरुणा या एकाच मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. कोलारमधून काथूर जी. मंजुनाथ यांना पक्षाने रिंगणात उतरवले आहे. काही दिवसांपूर्वीच जनता दल (निधर्मी) मधून पक्षात आलेले के. एक. शिवलिंगे गौडा यांना काँग्रेंसने अरसीकेरेमधून उमेदवारी दिली आहे. जनता दलाने ६ उमेदवारांची तिसरी यादी शनिवारी जाहीर केली. पक्षाने आतापर्यंत १४९ उमेदवार जाहीर केले आहेत.
कर्नाटकात राष्ट्रवादी लढविणार ४० जागा
बंगळूर/मुंबई : कर्नाटकात किमान ४० जागा राष्ट्रवादी लढविणार आहे. शरद पवार यांच्या विचारसरणीला अनुसरून भाजपमधील अनेक असंतुष्ट नेते राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत असे राष्ट्रवादीचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष हरी आर यांनी शनिवारी सांगितले. शरद पवार यांनी पक्षनेते आणि कर्नाटकातील कार्यकर्त्यांशी शनिवारी बैठक घेतली. भाजपच्या चार ते पाच विद्यमान आमदारांसह बंगळुरूचे माजी महापौरही पक्षात येण्यास इच्छुक आहेत, असेही रवी यांनी सांगितले.