karnataka assembly election: राष्ट्रवादीच्या उमेदवारीने निपाणीच्या राजकारणाला कलाटणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 06:47 PM2023-04-18T18:47:55+5:302023-04-18T19:09:21+5:30
राष्ट्रवादीचे नेते काकासाहेब पाटील यांच्या विरोधात
दादा जनवाडे
निपाणी : युवा नेते उत्तम पाटील यांना अखेर राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या या उमेदवारीने निपाणी तालुक्याच्या राजकीय समीकरणे नक्कीच कलाटणी मिळणार आहे. उत्तम पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळेल, असा विश्वास होता. पण काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी कार्यकर्ता हाच माझा पक्ष या तत्त्वावर जोरदार तयारी सुरू केली. अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तम पाटील यांना उमेदवारी देऊन निपाणीच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे.
निपाणीचे माजी आमदार व काँग्रेसचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटील यांचे व शरद पवार यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. त्यामुळे काकासाहेब पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही, असा विश्वास बहुतांशी लोकांना होता. अशा बातम्या ही सर्वत्र फिरत होत्या. पण राष्ट्रवादीने उमेदवार देऊन अनेक शक्यतांना संधी उपलब्ध करून दिली आहे.
उत्तम पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांना राष्ट्रवादीतील नेत्यांची प्रचारासाठी मोठी साथ लाभणार आहे. निपाणी मतदारसंघात व बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिकांमध्ये शरद पवार यांच्याबद्दल कमालीचे प्रेम व सहानुभूती आहे. शरद पवार हे वैयक्तिक अथवा आपल्या पक्षाच्या माध्यमातून नेहमीच सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. निपाणी मतदारसंघातील मतदारांमध्येही त्यांच्याबद्दल प्रेम आहे. राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याने अनेक नेते प्रचाराला उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रचारातही मोठी रंगत येणार आहे.
या उमेदवारीने काही प्रमाणात जातीच्या समीकरणांमध्येही फरक पडणार असून मराठा, मुस्लिम व मागासवर्गीय समाजाची मते उत्तम पातीळ यांच्या पारड्यात पडू शकतात. या तिन्ही समाजांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल प्रेम आहे.
कागलचे आमदार व माजी मंत्री हसन मुश्रीफ निपाणीचे जावई आहेत. निपाणीशी त्यांचा नेहमी असलेला स्नेह आणि येथील मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल असलेली आदराची भावना ही उत्तम पाटील यांच्या पाठीशी असणार आहे.
समिती काय करणार?
महाराष्ट्र एकीकरण समितीला शरद पवार यांनी नेहमीच सहकार्य केले आहे. मराठी भाषिकांवर जेव्हा जेव्हा अन्याय होईल त्यावेळी शरद पवार यांनी मराठी भाषिकांची बाजू घेत त्यांना आधार देण्याचे काम केले आहे. यामुळेच सीमा भागातील मराठी मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे. निपाणी मतदारसंघात त्यांच्या पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याने महाराष्ट् एकीकरण समिती त्यांच्याविरोधात लढणार की, पाठिंबा देणार हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीचे नेते काकासाहेब पाटील यांच्या विरोधात
यापूर्वी अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काकासाहेब पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. खुद शरद पवार यांनीही गेल्याच निवडणुकीत काकासाहेब पाटील यांचा प्रचारसाठी जाहीर सभा घेतली होती. पण यंदा ते काकासाहेब पाटील यांच्या विरोधात प्रचार करताना दिसणार आहेत. यामुळेही निवडणुकीच्या वातावरणात बदल होणार आहे.