Karnataka Assembly Election Result: आणखी एक राज्य भाजपाच्या हातातून निसटले, आता केवळ एवढ्या राज्यात उरली सत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 06:12 PM2023-05-13T18:12:44+5:302023-05-13T18:16:19+5:30
Karnataka Assembly Election Result: कर्नाटकमधील दारुण पराभवाबरोबरच दक्षिणेतील कर्नाटकसारखं महत्त्वाचं राज्य भाजपाच्या हातातून निसटलं आहे. त्यामुळे आता काही मोजक्याच राज्यांमध्ये भाजपाची सत्ता राहिली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. २२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपाच्या खात्यात केवळ ६४ जागा गेल्या आहेत. तर काँग्रेसने तब्बल १३६ जागांवर कब्जा केला आहे. या पराभवाबरोबरच भाजपाच्या दक्षिण भारतातील अभियनाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिणेतील कर्नाटकसारखं महत्त्वाचं राज्य भाजपाच्या हातातून निसटलं आहे. त्यामुळे आता काही मोजक्याच राज्यांमध्ये भाजपाची सत्ता राहिली आहे.
कर्नाटकमध्ये २०१८ साली झालेल्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. तेव्हा राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं. मात्र बहुमत नसल्याने शपथ घेतल्यानंतर काही दिवसांतच येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं होतं. मात्र नंतर ऑपरेशन लोटस राबवून भाजपाने कर्नाटकमधील सत्ता हस्तगत केली होती. मात्र आता दारुण पराभवासह भाजपाला एका महत्त्वाच्या राज्यातील सत्ता गमवावी लागली आहे. अगदी सहा महिन्यांपूर्वीच हिमाचल प्रदेशमध्येही भाजपाचा पराभव झाला होता.
कर्नाटकमधील पराभवामुळे भाजपाची सत्ता असलेलं आणखी एक राज्य कमी झालं आहे. सध्या देशातील १५ राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. त्यातील १० राज्यांमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. तर ५ राज्यात भाजपाच्या मित्र पक्षांकडे मुख्यमंत्रिपद आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, गुजरात, हरयाणा, मध्य प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड, पाँडेचेरी आणि सिक्कीम या राज्यांमध्ये भाजपाच्या मित्र पक्षांचे मुख्यमंत्री आहेत.