Karnataka Assembly Election: आम्हाला मुस्लिम मतांची गरज नाही, भाजपाच्या बड्या नेत्याचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 02:49 PM2023-04-25T14:49:36+5:302023-04-25T14:50:10+5:30
Karnataka Assembly Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार रंगात आला आहे. यादरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार रंगात आला आहे. यादरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मुस्लिम मतांची आवश्यकता नाही, असं विधान ईश्वरप्पा यांनी केलं आहे.
ईश्वरप्पा म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजपाला शिवमोगा शहरातील ६० हजार मुस्लिमांच्या मतांची गरज नाही. काल शिवमोगा येथे प्राचारसभेला संबोधित करताना ईश्वरप्पा यांनी हे विधान केले. सर्व जातीच्या लोकांशी चर्चा करून भाजपा सरकारदरम्यान, त्यांना काय काय लाभ झाला, याची आपण माहिती घेतली पाहिजे. मात्र शहरात सुमारे ६० हजार मुस्लिम आहेत. त्यांच्या मतांची आम्हाला गरज नाही.
असे अनेक मुस्लिम आहेत, ज्यांना भाजपा सरकारकडून वैयक्तिक लाभ मिळाला आहे. गरजेच्या वेळी मत मिळाली असेल तर ते आम्हाला मतदान करतील. राष्ट्रवादी मुस्लिम भाजपालाच मतदान करतील. आमच्या सरकारमध्ये कुठल्याही हिंदूला कुठलीही अडचण नाही आहे. ते सुरक्षित आहेत. त्यांच्यावर हल्ला करण्याची हिंमत कुणालाही झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
भाजपाच्या सरकारमध्ये हिंदू सुरक्षित होते. हिंदूंवर हल्ला करण्याची कुणाचीही हिंमत झालेली नाही. जर भाजपाला विजय मिळाला नाही, तर हिंदू हे तितकेसे सुरक्षित राहणार नाहीत, असे लोकांना वाटते, असेही ते म्हणाले.