मूर्खांचे करावे काय! गुजरातमध्ये केबल ब्रिज तुटून शेकडो मेले; कर्नाटकात ब्रिजवर नेली कार...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 07:41 PM2022-11-01T19:41:14+5:302022-11-01T19:41:44+5:30
झुलत्या पुलावर कार नेणारे पर्यटक महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. सुदैवाने यावेळी मोठी दुर्घटना टळली.
बंगळुरू: गुजरातमधील पूल दुर्घटनेतून देशातील नागरिकांनी धडा घेतला नसल्याचे दिसून येत आहे. मोरबी येथील पूल दुर्घटनेत 135 लोकांचा मृत्यू आणि शेकडो लोक जखमी झाले. या घटनेच्या दोन दिवसानंतर कर्नाटकात काही लोकांनी चक्क पादचारी झुलत्या पुलावर कार नेल्याचा मूर्खपणा केल्याचे समोर आले आहे.
पादचारी पुलावर नेली कार
कर्नाटकात काही लोकांनी नदीवरील पादचारी झुलत्या पुलावर चक्क कार नेल्याची घटना घडली आहे. यावेळी स्थानिक लोकांनी विरोध केल्याने पर्यटकांनी तात्काळ पुलावरून गाडी हटवली. कार पादचारी केबल ब्रिजवर नेल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्थानिकांनी पर्यटकांची ही कार पुलावरुन ढकलून बाहेर काढल्याचे दिसत आहे.
No lessons learnt post #MorbiBridgeCollapse . Hooligans/tourists from Maharashtra were seen driving a car on a suspension bridge at Yellapura town in Uttara Kannada district of Karnataka. Finally the locals ensured that the car was driven back from the bridge in reverse gear. pic.twitter.com/RvVPOhB8CL
— Harish Upadhya (@harishupadhya) November 1, 2022
महाराष्ट्रातील पर्यटक
मिळालेल्या माहितीनुसार, हे पर्यटक महाराष्ट्रातील होते. त्यांच्या कारवरही महाराष्ट्रातील नंबर प्लेट दिसत आहे. स्थानिकांनी ढकलून कार पुलावरुन हटवली. यावेळी कारच्या मागे लोकांचा मोठा जमाव दिसतोय. कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापूर शहरात हा प्रसिद्ध शिवपुरा हँगिंग ब्रिज आहे. हा पूल राज्यातील प्रमुख पर्यटन क्षेत्रापैकी असून, या भागात येणाऱ्या लोकांची मोठी संख्या असते. आता या प्रकरणाचा तपास सुरू असून गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले.