Coronavirus : कर्नाटकात कोरोना निर्बंध शिथिल होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत, तज्ज्ञांच्या बैठकीत अंतिम निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 05:00 PM2022-01-19T17:00:00+5:302022-01-19T17:01:02+5:30
Karnataka CM Basavaraj Bommai : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लोकांना ताप आणि खोकला येत आहे. यासोबतच तिसऱ्या लाटेत लोक रुग्णालयात दाखल न होता घरीच बरे होत आहेत, असेही बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
बंगळुरू : कर्नाटकात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेले निर्बंध शिथिल करण्याचे संकेत येथील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहेत. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, राज्यात लागू केलेले निर्बंध, वीकेंड आणि रात्रीचा कर्फ्यू हटवण्यासाठी 21 जानेवारीला तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेतला जाईल, असे बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे.
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लोकांना ताप आणि खोकला येत आहे. यासोबतच तिसऱ्या लाटेत लोक रुग्णालयात दाखल न होता घरीच बरे होत आहेत, असेही बसवराज बोम्मई यांनी सांगितले. लोक कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आपला दैनंदिन व्यवसाय करू शकतात. तज्ज्ञांच्या समितीला लोकांच्या भावना अवगत करण्यात आल्याचे सांगितले. तसेच, लोकांच्या मागणीकडे लक्ष देण्याचे आदेश समितीला दिले आहेत. समिती राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहे, असे बसवराज बोम्मई म्हणाले.
शुक्रवारी होणाऱ्या तज्ज्ञांच्या बैठकीत राज्याचे संपूर्ण चित्र समोर येईल, असे बसवराज बोम्मई म्हणाले. तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयांवरही भार नाही. आम्ही रुग्णालयांना ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसने केलेल्या आरोपांवरही प्रतिक्रिया दिली, ज्यात काँग्रेसने कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल भाजपा नेत्यांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे म्हटले होते. याप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी तक्रार नोंदवण्याची गरज नसल्याचे बसवराज बोम्मई म्हणाले. ते म्हणाले की, मी मुख्य सचिव पी. रविकुमार यांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल भाजपा नेत्यांसह सर्वांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, वीकेंड कर्फ्यू उठवण्याच्या मुद्द्यावर त्यांनी हेच मत व्यक्त केले.
21 जानेवारीला तज्ज्ञांची बैठक
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई शुक्रवारी सकाळी तज्ज्ञांची बैठक घेत आहेत. जनतेच्या पाठिंब्याचे हे सरकार असून जनतेचे हित लक्षात घेऊन बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. लोकांचे जीव वाचवणे ही सरकारची पहिली प्राथमिकता आहे. तज्ज्ञ समितीच्या बैठकीत सर्वच बाबींवर चर्चा केली जाईल आणि बैठकीत घेतलेला निर्णय जाहीर केला जाईल, असेही बसवराज बोम्मई म्हणाले.