महाराष्ट्राच्या नेत्यांवर कायदेशीर कारवाईचा बोम्मई यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 07:43 AM2022-12-23T07:43:05+5:302022-12-23T07:43:39+5:30
सीमाप्रश्नी कर्नाटकचे हित जपण्याचा ठराव विधानसभेत केला मंजूर. राऊतांवरही टीका.
बंगळुरू : महाराष्ट्राबरोबर असलेल्या सीमाप्रश्नासंदर्भात कर्नाटकच्या हिताचे संपूर्ण रक्षण करण्याचा ठराव कर्नाटक विधानसभेने गुरुवारी एकमताने संमत केला. हा ठराव कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधानसभेत मांडला. सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्रातील नेते ज्या पद्धतीने वक्तव्ये करीत आहेत, ती आक्षेपार्ह आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांवर आवश्यकता भासल्यास आम्ही कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही बोम्मई यांनी दिला.
या ठरावात म्हटले आहे की, महाराष्ट्राने सीमाप्रश्न निर्माण केला असून त्या राज्याचा आम्ही निषेध करतो. कर्नाटकची भूमी, कन्नड भाषा, कन्नड भाषिकांचे हित यांविषयी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. जर कर्नाटकच्या हिताला धक्का लागला तर त्याविरोधात घटनात्मक व कायदेशीर पावले उचलण्याचा इशारा या ठरावात देण्यात आला आहे.
हा ठराव मंजूर करण्याच्या आधी विधानसभेत बोम्मईंनी सीमाप्रश्नासंदर्भात भाषण केले. त्यांनी सांगितले की, कर्नाटकची एकही इंच जमीन आम्ही कोणालाही देणार नाही. आमच्या राज्याच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलणार आहोत.
संजय राऊत यांच्यावर केली टीका
चीनने ज्या पद्धतीने भारताच्या भूभागावर आक्रमण केले, त्याच पद्धतीने आम्ही कर्नाटकमध्ये प्रवेश करणार आहोत, असे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्या वक्तव्याचा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी निषेध केला. राऊत हे चीनचे एजंट आहेत, असा आरोपही बोम्मई यांनी केला.