वडिलांची बदली, ‘ऑफिसर’ मुलीची एंट्री पित्यानेच केले पुष्पगुच्छ देऊन स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 08:37 AM2023-06-24T08:37:18+5:302023-06-24T08:37:46+5:30
मुलीचे स्वतःच्या पदावर स्वागत करताना वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता, त्यांची छाती अभिमानाने फुलली होती.
कर्नाटकाच्या मंड्या येथील सेंट्रल पोलिस स्टेशनमध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत बीएस व्यंकटेश यांची बदली झाली. बदलीच्याच दिवशी त्यांना सुखद धक्का बसला. कारण, त्यांची मुलगी वर्षा हिने वडिलांच्या हातून त्याच पोलिस स्थानकात पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. वडिलांनी पुष्पगुच्छ देऊन मुलीचे स्वागत केले. हा भावनिक बाप-मुलीचा क्षण इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. मुलीचे स्वतःच्या पदावर स्वागत करताना वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता, त्यांची छाती अभिमानाने फुलली होती.
व्यंकटेश गेल्या १६ वर्षांपासून सेंट्रल पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांची नुकतीच एसपी कार्यालयात बदली झाली. त्यांच्या जागी नवीन उपनिरीक्षक येणार होते; पण त्यांची मुलगी बीव्ही वर्षा हिचीच उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाली. वडिलांच्या प्रेरणेतून आणि प्रोत्साहनामुळेच वर्षाने पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि नशिबाने वडिलांच्या पदावरच तिची पहिली नियुक्ती झाली. वडिलांकडून पदभार स्वीकारल्यामुळे भाग्यवान समजते, असे ती म्हणाली.
पित्याकडून मुलीने पदभार स्वीकारताच संपूर्ण पोलिस ठाण्यात टाळ्यांचा कडकडाट झाला. हृदयस्पर्शी फोटो व्हायरल होत असून, कोणत्याही पित्यासाठी यापेक्षा अभिमानाचा क्षण असूच शकत नाही, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.